कमबॅक करना पडेगा! मुंबईच्या तिरंगा मोर्चातील बाळासाहेब ठाकरेंचं जेन झी स्टाईल पोस्टर व्हायरल

मुंबई तिरंगा रॅली: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी उठवलेला तीव्र आवाज आणि ‘जेन झी’ (Gen Z) तरुणाईच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर काल (25 जुलै) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला. या ऐतिहासिक विजयाचे औचित्य साधून आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Shivaji Park) येथे ‘तिरंगा रॅली’ आयोजित करण्यात आली. या मोर्चात तरुणाने झळकवलेल्या पोस्टर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Mumbai Tiranga Rally: ‘कमबॅक करना पडेगा’, बाळासाहेबांचे हटके पोस्टर

रॅलीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह ‘कमबॅक करना पडेगा!’ असा ‘जेन झी’ स्टाईल बॅनर तरुणांनी हातात धरला होता. तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) आणि अभिजीत दिपके यांच्या कामगिरीचे कौतुक करणारे ‘दोन वाघांना सलाम’ असे बॅनरही झळकले. तर एका लहान मुलीच्या हातात “मोदी, तुमच्यापेक्षा जास्त डोकं माझ्याकडे आहे” असा पोस्टर दिसून आला. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टवर ‘हिटलर का बेटा झुटलर’ या आशयाचा संदेश आणि पंतप्रधान मोदींचा फोटो छापलेला होता. याशिवाय कोळी बांधव पारंपारिक बँड पथकासह या रॅलीत सहभागी झाले होते.

Mumbai Tiranga Rally: ए. आर. रेहमानच्या गाण्यांवर तिरंगा उंचावत तरुणाई थिरकली!

शिवतीर्थावर चोहोबाजूने केवळ तरुणाईचा महापूर लोटला होता. हातात तिरंगा घेऊन आलेले हजारो तरुण-तरुणी संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या देशभक्तीपर गाण्यांवर थिरकताना दिसले. महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे-शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकाच मंचाच्या छताखाली आले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्टेजवर येताच संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला.

Raj Thackeray: काय म्हणाले राज ठाकरे?

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, “जो विजय आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलंत, त्या आंदोलनाला यश आलं. त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे हजर झाले आहात. या देशातले ‘जेन-झी’ हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात, हे या आंदोलनातून समजलं. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यातील फरक आता लोकांना समजला आहे. आम्ही या संपूर्ण यंत्रणेचे आभार मानतो,” असे त्यांनी म्हटले.

Uddhav Thackeray: काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. “आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षाची सुरुवात आहे, भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. जात, पात, धर्म विसरून ‘मी भारतीय’ म्हणत आपण सहभागी झालो आहोत. मी कालच म्हटलं होतं की, एका झुरळाने हुकूमशहाला नमवलं आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे.

मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या! तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल आणि महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे समजावून सांगत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी सरकार पुढे आले. मोदींना मला सांगायचंय की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून घालवताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना जीव दिलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना झाल्या आहेत. ही ठिणगी आता पडली आहे, देशभर वणवा पेटलाय. तरुणांनी देशाच्या सुवर्ण इतिहासातील एक पान लिहिले आहे,” असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Rahul Gandhi Letter to Amit Shah: ‘विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?’ राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल

Comments are closed.