बिर्याणीवर कलिंगड खाल्ले, अन्नातून विषबाधा एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
बिर्याणीनंतर कलिंगड खाणाऱया एकाच कुटुंबातील चार जणांचा उलटी-जुलाबाचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पायधुनीमध्ये घडली. यामध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे पायधुनी परिसरावर शोककळा पसरली आहे. या चौघांना नेमकी कशामुळे विषबाधा झाली हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
अब्दुल्ला अब्दुल कादर डोकाडिया (40), त्याची पत्नी नसरीन डोकाडिया (35), मोठी मुलगी आयेशा (16) आणि छोटी मुलगी जैनब (13) अशी घटनेतील मृतांची नावे आहेत. इस्माईल कर्टे मार्गावरील मोगल इमारतीच्या दुसऱया मजल्यावर डोकाडिया कुटुंब राहत होते. शनिवारी रात्री अब्दुल्ला यांचे दोन भाऊ आणि त्यातील एका भावाची तीन मुलं असे पाच जण अब्दुल्ला यांच्या घरी जेवायला आले होते. एकूण नऊ जणांनी एकत्र घरीच बनवलेली चिकन बिर्याणी खाल्ली. त्यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास दोघे भाऊ आणि तीन मुलं त्यांच्या घरी निघून गेले. मग रात्री एकच्या सुमारास अब्दुल्ला, नसरीन, आयेशा आणि जैनब यांनी घरीच कलिंगड खाल्ले आणि ते झोपी गेले. पण रविवारची सकाळ त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरली. सकाळी आधी अब्दुल्ला याला उलटी, जुलाबचा त्रास सुरू झाला. मग थोड्या वेळाने तिघींनाही उलट्या जुलाब होऊ लागले. त्यामुळे नातेवाईक असलेल्या डॉक्टरांना त्यांनी बोलावले. डॉक्टरने परिस्थिती बघून अन्य नातेवाइकांसह चौघांना साबु सिद्दीकी इस्पितळात नेले. पण डॉक्टरांनी चौघांची परिस्थिती पाहून त्यांना तत्काळ जे. जे. इस्पितळात जाण्यास सांगितले. त्यानुसार चौघांना जे. जे. इस्पितळात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्याआधीच जैनब हिला मृत घोषित करण्यात आले. तर उर्वरित तिघांवर उपचार सुरू असताना नसरिन हिचा मृत्यू झाला. मग काही वेळाने आयेगा हिचा तर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अब्दुल्ला याचाही मृत्यू झाला.
ते पाच जण ठणठणीत….
हे वृत्त पसरताच पायधुनी परिसरातील नागरिक हादरले. बिर्याणी खाणाऱ्या अन्य पाच जणांना काहीच त्रास झाला नाही. तर कलिंगड खाणाऱ्या अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊन ते सर्व दगावल्याने जे. जे. मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अब्दुल्लाने ज्यांच्याकडून कलिंगड घेतले होते त्यालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौघांचेही शवविच्छेदन झाले असून त्यांचा विसेरा आणि घरातून कलिंगडचा काही भाग व चिकन बिर्याणी तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन ही दुर्घटना घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पाणीपुरीतून सातजणांना बाधा; एकाचा मृत्यू
झारखंडमधील गिरीध जिह्यात पाणीपुरी खाल्ल्यामुळे दोन गावांतील 60 जणांना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यात एका सहा वर्षांच्या चिमुरडय़ा मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पाणीपुरी खाल्ल्याने या सर्वांना त्रास झाल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. पाणीपुरी विव्रेत्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
Comments are closed.