ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीय नवरात्रीत आलिशान घरात, 557 घरांचे होणार वितरण
ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडीवासीयांचे आलिशान घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील दोन विंगला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असून तिसऱ्या विंगला या आठवडय़ात ओसी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिन्ही विंगमधील 557 घरांचे वितरण नवरात्रीच्या मुहूर्तावर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतात. ना. म. जोशी मार्ग येथील 32 चाळींमधील 2560 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 23 मजल्यांचे 14 टॉवर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतीक्षा
पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील ‘ई’, ‘एफ’, ‘जी’ विंगमधील 557 घरांचे वितरण केले जाणार आहे. पितृपक्ष संपल्यावर रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाईल. चावी वाटपासाठी म्हाडाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून वेळ मिळताच तारीख निश्चित केली जाईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Comments are closed.