नागपूरमध्ये संघ मुख्यालयाच्या प्रभागातच तरुण स्वयंसेवकाने शड्डू ठोकला; भाजप नगरसेवकांवर निष्क्र
नागपूर निवडणूक 2026: नागपूर (Nagpur News) महापालिकेचा प्रभाग 22 भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रभाग आहे. कारण याच प्रभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय (RSS headquarters) येते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघ मुख्यालयात राहणारे संघाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी याच प्रभागातील मतदार आहेत. मात्र, यंदा प्रभाग 22 मधील भाजप नगरसेवकांवर निष्क्रियतेचा आणि प्रभागातील आवश्यक विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत एक तरुण स्वयंसेवक भाजप (BJP) उमेदवारांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
अवघ्या पंचवीस वर्षाच्या निनाद दीक्षित या तरुण स्वयंसेवकाने नागरिक समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या “फॉरवर्ड ब्लॉक” या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मला संघाच्या अनेक स्वयंसेवकांचा छुपा पाठिंबा असून माझी ही लढाई या भागात तसेच पारंपरिक राजकारणात परिवर्तनासाठी असल्याचे निनाद दीक्षितचे म्हणणे आहे. संघाचे मुख्यालय असलेल्या प्रभाग 22 मध्ये भाजप, काँग्रेससह सर्व पक्षांसमोर निनाद दीक्षित या तरुण स्वयंसेवकाने एक वेगळेच आव्हान निर्माण केले आहे.
Ninad Dixit: नेमकं काय म्हणाला निनाद दीक्षित?
निनाद दीक्षितने एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, प्रभागाच्या राजकीय स्थितीत बदल घडावे, अशी अपेक्षा आहे. मात्र भाजप, काँग्रेससारखे पक्ष ते बदल करू शकत नाही. म्हणून नागरिक समितीच्या माध्यमातून माझी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी संघाचे मुख्यालय असलेला प्रभागच दुर्लक्षित केला आहे. भाजपने नुसते गट्टू, टाईल्स आणि सिमेंटचे बांधकाम केले. लोकोपयोगी काम कुठे आहेत? भाजप आणि काँग्रेसने नागपुरात जनतेला गृहीत धरले आहे. जर तीन-चार टर्म होऊन, 60 वर्ष वय असलेले नगरसेवक बाजूला होणार नाही, तर तरुणांना संधी कशी आणि कधी मिळेल? असा सवाल त्याने उपस्थित केलाय.
महाराष्ट्र महाविद्यालयीन निवडणुका बंद करून ठेवल्या आहे. तरुणांनी जायचे कुठे? ते राजकारणात येणार कसे? राजकीय पक्ष तरुणांना फक्त पळायला लावणार, त्यांच्या माध्यमातून मते मिळवणार, मात्र तरुणांना संधी देणार नाही म्हणून नागरिक समितीच्या माध्यमातून माझी उमेदवारी आहे. व्यवस्था बदलविण्यासाठी आम्ही किमान एका प्रभागात तरी लढा देऊ शकतो आणि तेच आम्ही करतो आहोत. माझी उमेदवारी बंडखोरी कशी होईल? मी भाजपचा प्राथमिक सदस्य नाही. मी भाजपची उमेदवारी मागितली नाही. म्हणून माझी बंडखोरी नाहीच. मात्र, भाजपच्या विरोधात माझा उठाव निश्चित आहे. संघाचे मला समर्थन आहे, असा माझा दावा नाही. मात्र, अनेक स्वंयसेवक निश्चितच शांतपणे माझ्या पाठीशी आहेत, असे देखील निनाद दीक्षितने म्हटले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.