अपघातवार… देवदर्शनाहून गावी परताना अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू; दिवसभरात अपघातात 9 ठार

नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांत अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असून वाहनांची गती आणि रस्ते, ओव्हरटेक हीच अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे पाहायला मिळत आहे. आजचा मंगळवार हा अपघातवार ठरला असून दिवसभरात अपघाताच्या तीन मोठ्या घटना घडल्या असून तीन अपघातात एकूण 9 जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुलढाणा, चंद्रपूर आणि नांदेड (Nanded) जिल्ह्यातील ह्या घटना असून प्रत्येक अपघातात तीन जण ठार झाले आहेत. बुलढाण्यात पहाटेच्या सुमारास अपघाताची घटना घडली. तर, चंद्रपुरातही सायंकाळच्या सुमारास अपघात घडला. पिकअप आणि ट्रकच्या अपघातात तिघे ठार झाले आहेत. आता, नांदेड जिल्ह्यातील लोकरवाडी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नांदेडच्या माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. लोकरवाडी गावातील पवार कुंटुबीय मध्यप्रदेश येथील उज्जैन शिऊर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते परतीच्या प्रवासाला असताना अकोला खामगांव दरम्यान पवार यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात देवराव पवार, बेबीताई पवार, निकेतन पवार या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, कारचालक संतोष कदम व अन्य दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेने माहूर तालुक्यावर शोककळा पसरली असून लोकरवाडी गावातील हळहळ व्यक्त होत आहे.

नांदुराजवळ पहाटे अपघात

बुलढाण्यातील नांदुरा शहरात मंगळवारी आज पहाटे एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हा अपघात घडला. पहाटे साडेचार वाजता नांदुरा शहराजवळ आर्टिगा कार आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

चंद्रपुरातही अपघात, तिघांचा मृत्यू

चंद्रपूर शहरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी टाटा मॅजिक वाहनाला ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात टाटा मॅजिकच्या ड्रायव्हरसह 3 जणांचा मृत्यू झाला असून 14 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चंद्रपूर (Chandrapur) प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या अपघातात निर्दोष मोहूर्ले (ड्रायव्हर), मनाबाई सिडाम (65) आणि एक प्रवासी असे एकूण तिघे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा

19 वर्षे देशसेवा, अहिल्यानगरमधील माजी सैनिक 10 वी परीक्षा पास, मुलगाही उत्तीर्ण; निकालाचा डबल आनंद

अधिक पाहा..

Comments are closed.