Nanded News – स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल; उदय खंडेराय यांच्या जागी अतुल भोसले यांची नियुक्ती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) मोठे फेरबदल करत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांत शहरात झालेल्या तिहेरी हत्याकांडातून आणि इतर गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पालकमंत्री अतुल सावे यांनीही पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर, जिल्हा पोलीस प्रमुखांनी रात्री उशिरा हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

उदय खंडेराय यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पदासाठी अनेक ज्येष्ठ पोलीस निरीक्षक शर्यतीत असताना आणि राजकीय शिफारसी सुरू असताना, अधीक्षक अबिनाशकुमार यांनी अचानक अतुल भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भोसले यांच्या जागी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खंडेराय यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांची उकल करून साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला असला, तरी वाढत्या अवैध धंद्यांमुळे वरिष्ठांच्या नाराजीचा त्यांना फटका बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या नियुक्तीमागे प्रशासकीय गरज आहे की राजकीय वरदहस्त, याबाबत पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Comments are closed.