कॉपी मुक्तीचा नांदेड जिल्ह्याचा राहुल कर्डीले पॅटर्न, निकालांचा टक्का घसरला, मात्र गुणवंतांना संधी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

२००९ ते २०१२ या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी नांदेड जिल्ह्यात कॉपी मुक्तीचा पॅटर्न राबविला होता. त्यावेळी ३० टक्क्याने निकालाची टक्केवारी घसरली होती. त्याच पॅटर्नचा पुन्हा एकदा नांदेडात अनुभव आला असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या कॉपीमुक्तीच्या अभिनव पॅटर्नने जिल्ह्यात निकालाचा टक्का घसरला असला तरी गुणवंतांना या कॉपीमुक्तीचा फायदा झाला आहे.

२००९ ते २०१२ पर्यंत तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी नांदेड जिल्ह्यात कॉपीमुक्तीचा पॅटर्न राबविला होता. त्यावेळी जवळपास दिडशेहून अधिक भरारी पथके नेमून त्यांनी सामुहिक कॉपीचा पूर्णतः नायनाट केला होता. तत्पूर्वी त्यांनी नियोजन करत सहावेळा शिक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या बैठका घेवून याबाबतचे नियोजन केले होते. त्यावेळी जिल्ह्याचा निकाल ३० टक्क्याहून घटला होता.

दरवर्षीच कॉपीमुक्तीचे अभियान राबविले जाते. मात्र यावर्षी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून जानेवारीपासून नियोजन केले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे जाळे निर्माण करुन तसेच त्यांचे नियंत्रण कक्ष नांदेड येथे ठेवून या कॉपीवर नियंत्रण आणले होते. प्रामुख्याने सामुहिक कॉपी तसेच पेपर फुटीचे प्रकार, वर्गात होणारे चिटींग तसेच काही जणांच्या संगनमताच्या माध्यमातून होणारी कॉपी रोखण्यासाठी त्यांनी नियोजन केले. जिल्ह्यातील विविध केंद्रावर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या. यावेळी स्वतः जिल्हाधिकार्‍यांनी ४२ केंद्रांना भेटी दिल्या. वादग्रस्त बारा केंद्रावर भेटी देवून जवळपास ८० ते ९० मंडळींवर कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या. यात केंद्र प्रमुख, संबंधित परीक्षा केंद्रावरील हॉलवर उपस्थित असलेले शिक्षक तसेच कॉपी करणारे विद्यार्थी यांचा त्यात समावेश होता. जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष निर्माण करुन सीसीटीव्ही कॅमेरा व त्यांचे नियंत्रण कक्ष याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली होती.

याचा परिणाम म्हणून यावर्षीचा बारावीचा निकाल हा ७७.७० टक्के एवढा लागला असून, गतवर्षी बारावीचा निकाल ९२.६४ टक्के एवढा लागला होता. त्यामुळे यावर्षीचा निकाल १४.९४ टक्क्यांनी घसरला. प्रामुख्याने लोहा, कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात सामुहिक कॉपी व चिटींगचे प्रकार झाले होते. त्यावर देखील जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष केंद्रीत केले. आज दहावीचा निकाल लागला. हा निकाल ८३.६२ टक्के एवढा लागला असून, गतवर्षी ९१.९३ टक्के एवढा निकाल लागला होता. हा निकाल गतवर्षीच्या तुलनेत ८.३१ टक्के एवढा कमी लागला आहे. दोन्ही परिक्षेत लोहा, कंधारच्या केंद्रावरील निकालाचे प्रमाण १० ते ११ टक्क्यांनी कमी झाले आहे.

याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, निकालाचा टक्का घसरला असला तरी वेगवेगळ्या केंद्रावर सामुहिक कॉपीचे प्रकार होत असताना अन्य हुशार विद्यार्थी हे प्रचंड दबावाखाली राहायचे. आपल्याला या सामुहिक कॉपी प्रकरणात अडकवले तर जाणार नाही ना, याची भिती त्यांना असायची. मात्र तत्पूर्वीच विद्यार्थ्यांशी हितगूज साधून त्यांनी ताण-तणाव मुक्त केले होते. दोन्ही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत लोहा-कंधार तालुक्याचे निकाल दहा ते बारा टक्क्यंनी घसरले असून, याचा फायदा गुणवंतांना झाला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने विद्यार्थिनीचे उत्तीर्णाचे प्रमाण हे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. २००९ ते २०१२ नंतर कॉपीमुक्तीचा हा पॅटर्न तेरा वर्षानी प्रभावीपणे राबविल्याने जिल्हाधिकार्‍यांचा राहुल कर्डीले पॅटर्न निश्चित यशस्वी झाल्याचे मानले जाते.

Comments are closed.