Ratnagiri News – शिवसेनेचा दणका; महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याचे एस.टी. प्रशासनाकडून निलंबन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

“आमच्या आया-बहिणींची अब्रू इतकी स्वस्त नाही. संबंधित विकृत मनोवृत्तीच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू,” असा सज्जड इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी एस.टी. प्रशासनाला दिला. शुक्रवारी दुपारी त्यांनी दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांच्या दालनात भेट घेऊन ही भूमिका मांडली. यावेळी त्यांनी रत्नागिरी विभाग नियंत्रक जानकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संबंधित कर्मचाऱ्याच्या गैरप्रकारांची सविस्तर माहिती देत तातडीने कारवाईची मागणी केली.

गुजर यांच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत प्रशासनाने तत्काळ पावले उचलली. महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या या वाहक-कम-चालक कर्मचाऱ्याविरोधात अनेक तक्रारी असूनही यापूर्वी ठोस कारवाई झालेली नव्हती. मात्र शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर विभाग नियंत्रकांनी शुक्रवारी सायंकाळीच संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे लेखी आदेश दिले. त्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर शिवसेनेने उचललेले पाऊल यशस्वी ठरले.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार कार्यालयात धडक देत प्रशासनावर दबाव आणला होता. यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, महिला आघाडीच्या पदाधिकारी मानसी विचारे, सिंधू भाटकर, ममता मोरे, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वीही विविध लोकहिताच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. या कारवाईमुळे दापोली तालुक्यात सर्वत्र समाधान व्यक्त होत असून शिवसेनेच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

Comments are closed.