नाशिकमध्ये भीषण अपघात, मजुरांची पिकअप अन् कारची जोरदार धडक, तीन ठार, 10 जण जखमी

नाशिक अपघात बातम्या: नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यातील ताहाराबाद – अंतापूर मार्गावर गुरुवारी (11 सप्टेंबर) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस, आणि आशा सोनवणे यांचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी मजूर हे सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत आणि असेरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, पिकअप वाहन चालकाने आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारच्याा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.

अपघातानंतर वाहतूक ठप्प

अपघातानंतर ताहाराबाद – अंतापूर मार्गावर काही वेळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनांद्वारे शासकीय रुग्णालयात हलवले. गंभीर जखमींपैकी दोन मजुरांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. अपघातस्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आमदार दिलीप बोरसे यांनी केली पाहणी

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला आणि जखमींवर योग्य उपचार होण्यासाठी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

Nashik Accident : राहुड घाट तब्बल 42 तासांनंतर वाहतुकीसाठी खुला

दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात झालेल्या गॅस टँकर, ट्रक व पोकलेन यांच्या तिहेरी अपघातानंतर तब्बल 42 तास ठप्प झालेली वाहतूक बुधवारी (दि. 10) दुपारी तीन वाजता बीपीसीएल पथक, पोलीस व सोमा टोल पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुरळीत करण्यात यश आले. सोमवारी रात्री 9 वाजेपासून घाट बंदच होता. महामार्ग चौपदरीकरणानंतर मागील 15 वर्षांत अपघातामुळे इतक्या मोठ्या कालावधीसाठी वाहतूक ठप्प राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे साधारण 8 ते 9 हजार वाहने आणि सुमारे 32 ते 36 हजार प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यात चांदवडच्या जैन गुरुकुल संस्थेत शिकणारे जवळपास तीन हजार विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांना मोठा त्रास झाला. दोन दिवसांचा वेळ वाया गेल्याने अभ्यासक्रमावरही परिणाम झाला. घाट बंद असल्याने उमराणे, सौदाणे, चिंचवे व मुगसे परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना देवळा तालुक्यातील चिंचबारी किंवा मनमाडमार्गे शाळेत आणणे-नेणे भाग पडले. वाहनचालकांसाठी देखील ही परिस्थिती अत्यंत कष्टदायक ठरली. काही वाहनांनी पर्यायी मार्ग वापरला तर अनेक जड वाहनं महामार्गाच्या कडेला पार्किंग करून थांबून राहिली होती.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Dhule Crime: धुळे हादरलं, माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलानं आयुष्य संपवलं, वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसात…

आणखी वाचा

Comments are closed.