स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने ‘हॅपी होली’ म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
नाशिक गुन्हा: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठक्कर बाजार बस स्थानकात (Thakkar Bazar Bus Stand) मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याने मद्यपीला हटकल्याने अंगावर पेट्रोल टाकून ‘हॅपी होली’ म्हणून कर्मचाऱ्याला पेटवून दिले. बसस्थानकाच्या आवारात पुन्हा येऊ नको, असे मद्यपीला बजवल्यानं त्याने कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती समोर येत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याला पेटवणाऱ्या शुभम जगतापला पोलिसांच्या (Nashik Police) ताब्यात घेतले आहे. तर स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत हा सुमारे 60 टक्के भाजल्याचे माहिती मिळत आहे. या प्रकरणामुळे नाशिकच्या (Nashik News) ठक्कर बाजार बस स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात विजय गेहलोत सफाईचे काम करत होता. यावेळी आरोपी शुभम जगताप त्या ठिकाणी आला. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्याने मद्यपी शुभमला हटकले. या ठिकाणी पुन्हा येऊ नकोस, असे स्वच्छता कर्मचाऱ्याने मद्यपी शुभमला सांगितले.
स्वच्छता कर्मचारी 60 टक्के भाजला
स्वच्छता कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग अनावर झाल्याने शुभमने विजयच्या अंगावर पेट्रोल ओतले. तसेच विजयला “हॅपी होली” म्हणून शुभेच्छा दिल्या आणि आग लावली. या आगीत विजय होरपळला. तेथील काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर विजयला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या आगीत विजय 60 टक्के भाजला गेल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी आरोपी शुभम जगतापला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या
दहावीची लेखी परीक्षा अवघड गेल्याने तणावात असलेल्या 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रिफा फातेमा नवाज कुरैशी असे मृत मुलीचे नाव असून ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास वडाळा रोडवरील काजीनगर परिसरातील अजनूर सोसायटीत घडली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रिफा हिने नुकतीच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीची लेखी व तोंडी परीक्षा दिली होती. परंतु ही लेखी परीक्षा कठीण गेल्याने ती तणावात होती. पेपर अवघड गेल्याची बाब तिने कुटुंबासही सांगितली होती. दरम्यान, रमजान महिना सुरू असल्याने तिचे आई-वडील सोमवारी दुपारी खरेदीसाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी घरी कुणीही नसल्याची संधी साधून रिफाने परीक्षेच्या तणावातून किंवा अन्य कारणातून घरातील बेडरुममध्ये गळफास लावून घेतला.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.