कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिस
नाशिक क्राईम न्यूज : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड (Manmad) शहरातून एक धक्कादायक गुन्हेगारी घटना (Crime News) समोर आली आहे. गाडीला कट मारल्याच्या एका अतिशय किरकोळ कारणावरून कार चालकाने एका दुचाकीस्वारावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या मुजोर कार चालकाने दुचाकीस्वाराच्या पोटात थेट चाकूने वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनमाड शहरात खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News: नेमकं काय घडलं?
इरफात बेग असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. इरफात हा आपल्या दुचाकीवरून मनमाड शहरातील चोपडा पेट्रोल पंपाजवळून जात होता. याच वेळी येवल्याच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या एका कारचा इरफातच्या दुचाकीला कट लागला. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी इरफातने कार चालकाला अडवले. मात्र, कार चालकाला याचा इतका राग आला की, त्याने कसलाही विचार न करता थेट चाकू काढला आणि इरफातच्या पोटात खुपसला.
Nashik Crime News: पोलिसांचा 25 किलोमीटर थरारक पाठलाग
इरफातवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून कारसह सुसाट वेगाने फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी (Manmad Police) तत्काळ वायरलेसवरून मेसेज पाठवून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश दिले. आरोपी कारसह येवल्याच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी तब्बल 25 किलोमीटरपर्यंत या कारचा थरारक पाठलाग केला.
Nashik Crime News: पोलिसांच्या अंगावर घातली कार
मनमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून येवला पोलिसांनी (Yeola Police) शहराजवळ नाकाबंदी करून आरोपीची कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर पोलीस उभे असल्याचे पाहूनही मुजोर कार चालकाने कारचा वेग कमी करण्याऐवजी ती थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा आणि त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि जीवाची बाजी लावून बाजूला होत कारची नाकेबंदी केली आणि अखेर आरोपीला घेराव घालून बेड्या ठोकल्या.
Nashik Crime News: आरोपी पोलिसांच्या ताब्यात; जखमी तरुण रुग्णालयात
पोलिसांनी अटक केलेल्या या मुजोर कार चालकाचे नाव लक्ष्मीकांत शेजवळ असे आहे. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असून, त्याच्याविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इरफात बेग याच्या पोटात गंभीर जखम झाल्यामुळे त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील तातडीच्या उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Comments are closed.