25 लाख अन् 21 तोळे सोने देऊनही हाव मिटेना, नाशिकमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपवलं
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकच्या (Nashik) जेलरोड (Jail Road) परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी होणारा छळ आणि पतीचे अनैतिक संबंध याला कंटाळून आशा प्रवीण घोटेकर या विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी (Police) पतीसह दोघांना अटक केली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News: 25 लाख आणि 21 तोळे सोन्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, आशा घोटेकर यांचा विवाह झाल्यापासूनच सासरच्या मंडळींकडून त्यांचा छळ सुरू होता. फ्लॅट खरेदी करण्यासाठी आणि चारचाकी गाडी घेण्यासाठी सासरच्यांनी 25 लाख रुपयांची मागणी लावून धरली होती. बहिणीचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी भावाने आपल्या आईच्या नावावर असलेली जमीन विकून सासरच्यांना पैसे दिले होते. तसेच लग्नात 21 तोळे सोनेही देण्यात आले होते. मात्र, इतकी मोठी रक्कम आणि सोने देऊनही सासरच्यांची हाव मिटली नव्हती.
Nashik Crime News: अनैतिक संबंध आणि जादूटोण्याची धमकी
पीडित महिलेच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आशा यांचा पती प्रवीण घोटेकर याचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. आशा यांचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे. इतकेच नाही तर, “तुला जादूटोणा करून मारून टाकू,” अशी धमकीही त्यांना वारंवार दिली जात होती.
Nashik Crime News: दोषींना बेड्या; पोलीस तपास सुरू
वारंवार होणारा छळ आणि धमक्यांना कंटाळून अखेर आशा घोटेकर यांनी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून पतीसह दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nida Khan: निदा खानकडे होती ‘मिशन कन्व्हर्जन’ची जबाबदारी? नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात खळबळजनक खुलासा
आणखी वाचा
Comments are closed.