नाशिकमध्ये महायुतीत जागा वाटपाचे भिजत घोंगडे; कार्यकर्त्यांचीही घालमेल, गिरीश महाजन शिवसेना अन्
नाशिक निवडणूक 2026: आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Election 2026) पार्श्वभूमीवर महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकीकडे युतीची शक्यता धूसर होत चालली असताना, दुसरीकडे घटक पक्षांमध्ये आरोप–प्रत्यारोप आणि जबाबदारी ढकलण्याची स्पर्धा सुरू असल्याचं चित्र आहे. नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना महायुतीचं भिजत घोंगडे कायम असून, कार्यकर्त्यांचीही मोठी घालमेल होत आहे.
या पार्श्वभूमीवर, महायुती टिकवण्यासाठी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आज संध्याकाळी नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ही चर्चा महायुतीच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
Nashik Election 2026: भाजपकडून 122 पैकी 85 जागांची मागणी
नाशिकमध्ये भाजपने एकूण 122 पैकी तब्बल 85 जागांची मागणी केली आहे. भाजप शहराध्यक्षांनी सांगितले की, पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे जागा मिळाव्यात, अशी भाजपची भूमिका आहे. भाजपकडून 85, शिवसेनेकडून 45 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 30 जागांचा प्रस्ताव असून या आकड्यांमुळेच युतीत तणाव वाढला आहे.
Nashik Election 2026: शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न, पण संभ्रम कायम
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट केलं आहे की, शेवटच्या क्षणापर्यंत मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते दिलेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतील. मात्र, प्रत्यक्षात नाशिकमध्ये जागावाटपावर युतीचं घोडं अडकलं असून, शिंदे सेनेनंतर आता भाजपकडूनही स्वबळावर 122 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Nashik Election 2026: शिवसेनेची भाजपवर नाराजी
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) उपनेते अजय बोरस्ते यांनी भाजपच्या भूमिकेवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. “महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. पण मोठ्या भावाने लहान भावांचं आहे ते काढून घेणं, हा कोणता न्याय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही आमदार महायुती म्हणून निवडून आले. तेव्हा भाजपचे नेते आमच्याकडे चार–चार वेळा आले. आता मात्र चर्चा करायलाही तयार नाहीत,” असे देखील अजय बोरस्ते यांनी म्हटले आहे.
Nashik Election 2026: युती झाली नाही तर शिवसेना–राष्ट्रवादी एकत्र?
अजय बोरस्ते यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,“नाशिकमध्ये महायुती व्हावी ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचीही इच्छा आहे. तसेच नाशिककरांचीही हीच अपेक्षा आहे. मात्र स्थानिक पातळीवर चर्चा का होत नाही, हा प्रश्न आहे. जर महायुती झाली नाही, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र निवडणूक लढवतील. युती न झाल्यास शिवसेना 122 जागांवर सक्षम उमेदवार देण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
Nashik Election 2026: भाजपकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न
दरम्यान, नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या नाराजी नाट्यानंतर भाजपकडून डॅमेज कंट्रोलचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप कार्यालयात बैठक घेऊन नाराज उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शहराध्यक्षांकडून केला जात आहे. मात्र, “आयात उमेदवारांमुळे निष्ठावंतांवर अन्याय होणार का?” असा सवाल भाजप कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत असून, ही नाराजी वाढल्यास भाजपला शहरात मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
BMC Election 2026: भाजपचा मुंबईतील पहिला उमेदवार ठरला? व्हिडीओ व्हायरल, कोणाला मिळाली संधी?
आणखी वाचा
Comments are closed.