‘फिजिक्सवाला’मधील कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं, नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाख
नाशिक मनसे : नाशिक शहरात खाजगी कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘फिजिक्सवाला’ (Physics Wallah) कोचिंग क्लासमध्ये गोंधळ घातला होता. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) मनसेच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना नाशिकमधील शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला कोचिंग क्लासमध्ये घडली. या क्लासमध्ये बहुसंख्य विद्यार्थी मराठी भाषिक असून त्यांची मातृभाषा मराठी आहे. मात्र क्लासमधील बहुतांश शिक्षक हे परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांना हिंदी समजण्यात अडचणी येत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वारंवार वाद होत असल्याची तक्रार मनविसेकडून करण्यात आली.
मनसेचा आरोप आहे की, एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना “मराठीत शिकवणार नाही, शिकायचं असेल तर हिंदीतच शिका” अशी अरेरावी केली. यासोबतच मराठी भाषेला गावठी म्हणून हिनवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष ललित वाघ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश भोई, बाजीराव मते, उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणेशहर संघटक अक्षय कोंबडे, विभाग अध्यक्ष रोहित उगावकर यांच्यासह काही कार्यकर्ते थेट क्लासमध्ये दाखल झाले.
Nashik MNS: मराठी बोलण्यास विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण
मनसे पदाधिकाऱ्यांनी क्लास व्यवस्थापनाला जाब विचारत शिक्षकांची यादी मागितली. ‘पांडे’ नावाच्या शिक्षकाला हजर करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांवर दादागिरी करणे, धमक्या देणे, मराठीत बोलण्यास मज्जाव करणे, या मुद्द्यांवरून व्यवस्थापनाला धारेवर धरण्यात आले. याच वादात मराठी बोलण्यास विरोध करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या गोंधळामुळे क्लासमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Nashik MNS: मॅनेजरकडून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
तसेच, क्लासमधील सर्व परप्रांतीय शिक्षकांचे सात दिवसांत राजीनामे घ्यावेत आणि त्यांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा क्लासची तोडफोड करून पुन्हा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार मारहाण, धमकी आणि गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली मनसेच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत असून, या घटनेमुळे नाशिकमधील शैक्षणिक वर्तुळात आणि राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.