ना बैठक लावणार, ना खडसावून जाब विचारणार! समृद्धी महामार्गावर दरोड्यानंतर अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात तब्बल 18 लाख रुपयांची लूट झाल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा याच परिसरात प्रवाशांची कार अडवून मारहाण करीत रोकड व सोन्याचे दागिने लुटल्याची गंभीर घटना समोर आली. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. या लागोपाठ घडलेल्या घटनांवरून शिवसेना नेते, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘या गंभीर घटनेनंतरही प्रशासनाची साधी बैठक लावून यंत्रणेला खडसावणे किंवा जाब विचारणे तर दूरच, पण डोळे वटारूनही पाहिले जाणार नाही असा आम्हाला विश्वास आहे अशा खोचक शब्दात त्यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘समृद्धी एक्स्प्रेसवे’वर एका चारचाकीला दर किलोमीटरसाठी द्यावा लागणारा टोल — ₹ २.०७, आणि त्या मोबदल्यात…
१. १८ लाखांचा दरोडा
२. दरोड्यानंतर फोडलेले टायर बदलून देण्याचे चोरांचे सौजन्य
३. प्रचंड भीती
४. पोलिसांची शून्य गस्त
५.… pic.twitter.com/L1EKqpcTIt— अंबादास दानवे (@iambadasdanve) 31 ऑगस्ट 2026
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये दानवे यांनी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेतील त्रुटींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘समृद्धी एक्स्प्रेसवे’वर एका चारचाकीला दर किलोमीटरसाठी द्यावा लागणारा टोल — ₹ 2.07, आणि त्या मोबदल्यात…प्रवाशांच्या वाट्याला 18 लाखांचा दरोडा, दरोड्यानंतर फोडलेले टायर बदलून देण्याचे चोरांचे सौजन्य, प्रचंड भीती, पोलिसांची शून्य गस्त, जनावरांचा मुक्त संचार, वाहनांमधील बॅटऱ्या आणि डिझेलची चोरी, चोरट्यांना झाडांचा आडोसा, काठ्या, लाथा, बुक्क्यांचा मार, बंद सीसीटीव्ही कॅमेरे, फोनला प्रतिसाद न देणारी बोगस यंत्रणा, गॅस गळती, गाड्यांवर दगडफेक या गोष्टी मिळतात. अंबादास दानवे यांनी महामार्गावरील निष्क्रीय यंत्रणेवर ताशेरे ओढताना ‘तथाकथित इन्फ्रामॅन’ असा उपरोधिक उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवर टोला लगावला. या गंभीर घटनेनंतरही प्रशासनाची साधी बैठक लावून यंत्रणेला खडसावणे किंवा जाब विचारणे तर दूरच, पण डोळे वटारूनही पाहिले जाणार नाही असे म्हणत दानवे यांनी प्रशासकीय सुस्ततेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Comments are closed.