नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; एपीएमसीतील कांदा-बटाटा, मसाला मार्केट डेंजर झोनमध्ये, महापालिका प्रशासनाने केली यादी जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई शहरात ५०४ इमारती धोकादायक असल्याचे महापालिका प्रशासनाने आज जाहीर केले. या इमारतींमध्ये अतिधोकादायक ५२ इमारती असून त्यामध्ये सर्वाधिक वर्दळ असलेल्या एपीएमसी मार्केटमधील कांदा-बटाटा मार्केट आणि मसाला मार्केटचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीत सी-२ प्रवर्गात मोडणाऱ्या १०२, सी-२ बी प्रवर्गात मोडणाऱ्या २९७ आणि सी-३ प्रवर्गात मोडणाऱ्या ५३ इमारतींचा समावेश आहे.

नवी मुंबई शहरात सी-१ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५२ इमारती या अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निष्कासित करणे आवश्यक आहे. इमारती रिकाम्या करून संरचनात्मक दुरुस्ती करणे अशा ‘सी-२ ए’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या १०२ इमारती आणि इमारती रिकाम्या न करता रचनात्मक दुरुस्ती करणे अशा ‘सी-२ बी’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या २९७ इमारती आहेत. त्याचबरोबर इमारतींची किरकोळ दुरुस्ती या ‘सी-३’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५३ इमारती आहेत. धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ‘विभाग’ सेक्शनमध्ये ‘अतिक्रमण विभाग’ माहितीच्या सेक्शनमध्ये ‘सामान्य माहिती’ या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वीज, नळ जोडणी तोडणार

महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जर या इमारतींचा निवासी आणि वाणिज्य वापर थांबला नाही तर सी-१ या प्रवर्गात मोडणाऱ्या इमारतींचा वीज आणि नळ जोडणी तोडण्यात येणार आहे. अतिधोकादायक इमारती रहिवाशांनी तातडीने रिकाम्या कराव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

महापालिका प्रशासनाने अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींमध्ये एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केट, मॅफको मार्केट आणि मसाला मार्केटचा समावेश आहे. या मार्केटमध्ये हजारो नागरिकांची दररोज वर्दळ असते.

इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या इमारती दुरुस्त करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत कोणत्याही प्रकारे घोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.