हातावर मेहंदी, पोटाचा भाग रक्तबंबाळ, नवी मुंबईत लग्नासाठी आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा मृत्यू
नवी मुंबईतील परदेशी व्यक्तीचा मृत्यू झाला. नवी मुंबईत मित्राच्या लग्नासाठी आलेल्या एका स्वीडिश तरुणाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा तरुण अवघ्या 25 वर्षांचा होता. प्रणय शाह याच्या लग्नासाठी हा तरुण स्वीडनवरुन नवी मुंबईत (Navi Mumbai) आला होता. मात्र, रविवारी पहाटे सानपाड्यातील (Sanpada news) सेक्टर 1 मध्ये घडलेल्या एका विचित्र दुर्घटनेत या तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचे नाव एल्डे एडवर्ड (Alde Edvard Jan) असे होते. तो प्रणय शाह याच्या लग्नासाठी नवी मुंबईत आला होता. वाशीतील रघुलीला मॉलमध्ये असणाऱ्य बँक्वेट हॉलमध्ये प्रणय शाह याचे लग्न होते. लग्न लागल्यानंतर एल्डे एडवर्ड हा आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला. यानंतर त्याने मित्रांसोबत मद्यपान केले. त्यानंतर पुन्हा लग्नाच्या ठिकाणी परत येत असताना हा तरुण रस्ता चुकला आणि त्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या तरुणाचा मृत्यू कसा झाला, याबाबत काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. पोलिसांकडून (Navi Mumbai Police) हा तरुण एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो इमारतीच्या गेटवरुन उडी मारुन आत जात असल्याचे दिसत आहे. मात्र, यानंतर तो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडला आणि त्यामध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. तो दारुच्या नशेत असल्यामुळे इमारतीवरुन खाली पडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
मात्र, सोशल मिडीयावरील एका पोस्टनुसार काहीजण एल्डे एडवर्ड याचा पाठलाग करत होते. त्यामुळे तो धावत सेक्टर एक मधील साईराज कॉम्प्लेक्स सोसायटीच्या सुरक्षा भिंतीवरुन उडी मारून आत आला. यामध्ये त्याला दुखापत झाली. त्याने लिफ्टमधून वर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पायऱ्यांवरच कोसळला. त्याच्या पोटाच्या भागातून रक्तस्राव सुरु होता. या अवस्थेतही तो नागरिकांशी बोलत होता. मी ठीक आहे. पण माझ्या पायाला दुखापत झाली आहे, असे तो सांगत होता. त्याला वेदनाही होत होत्या. यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली तेव्हा त्यांनी एल्डे एडवर्डला रुग्णालयात नेण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. एक पोलीस अधिकारी त्याठिकाणी आला. नागरिकांनी एल्डे याला वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी या पोलीस अधिकाऱ्याने, ‘काही झालेलं नाही, त्याच्या नाकाचा घुना फुटला असेल’, असे सांगत दुर्लक्ष केले. यामुळे एल्डे याला रुग्णालयात नेण्यास उशीर झाला, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी एल्डे एडवर्ड याला वेळेवर रुग्णालयात नेले असते तर त्याचा जीव वाचला असता, असेही नागरिकांनी म्हटले.
हा सगळा प्रकार घडल्यानंतर एल्डे एडवर्ड ज्याच्या लग्नासाठी नवी मुंबईत आला होता, त्या प्रणय शाह याला रविवारी संध्याकाळी एल्डे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी तो सायन रुग्णालयात होता. यानंतर प्रणय शाह याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Navi Mumbai crime news: सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
सानपाड्यात वास्तव्याला असणाऱ्या संजय मालमे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहली आहे. यामध्ये त्यांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. डोळ्यासमोर एका परदेशी तरुणाच्या झालेल्या मृत्यूने प्रचंड अस्वस्थ करून सोडले आहे. एक विदेशी तरुण आपल्या भारतात आलेला आहे, त्याच्या संकटाच्या काळात मानवी अनास्थेमुळे भारतीय पोलीस आणि वैद्यकीय मदत देण्यात यंत्रणा कशी कुचकामी ठरली हे उघड्या डोळ्यांनी पाहिले. एखाद्या हॉलीवूडच्या हिरोसारखा दिसणाऱ्या तिशीच्या आतल्या देखण्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत व्हावा आणि आपण काहीच करू शकलो नाही, याच्या प्रचंड वेदना होत आहेत, असे संजय मालमे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
नवी मुंबईतील सानपाडा येथील सेक्टर १ मध्ये रविवारी पहाटे पावणे दोन वाजता एक परदेशी तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आश्रयासाठी साईराज कॉम्प्लेक्स सोसायटीत येथे पोहचला. काहीजण पाठलाग करत असल्याचे तो सांगत होता. तो प्रचंड घाबरला होता. तो भिंतीवरून उडी मारून दुसऱ्या सोसायटीत गेला. त्याची जीव वाचवण्याची धडपड सुरू होती. त्याने लिफ्टमधून वर जाण्याचा प्रयत्न केला. त्याला चालणे अशक्य झाल्याने तो कोसळला.
त्याचवेळी मी तिथे पोहचलो. पोलीस हेल्पलाईनला फोन करून माहिती दिली. ती व्यक्ती परदेशी असल्याने त्यामागील गांभीर्य संबंधित ऑपरेटरला लक्षात आणून दिले. माझ्या अगोदरही तेथील रहिवाश्यांनी पोलीस हेल्पलाईनला कळवले होते. मात्र अर्ध्या तासांनंतरही कुठलीही पोलीस वा वैद्यकीय मदत आली नव्हती. त्या काळात तो विदेशी तरुण वेदनेने विव्हळत पडला होता. त्याच्या वेदना असह्य झाल्याचे पाहून सोसायटीतील दोन रहिवाशी मोटरसायकलवर सानपाडा पोलीस स्टेशनला पोहचले. ही घटना घडली, तेथून पोलीस स्टेशन अवघ्या ३०० मीटर अंतरावर आहे.
पोलीस ठाण्याच्या प्रशस्त इमारतीचे तीन- चार महिन्यापूर्वीच उद्घाटन झाले आहे. हे नागरिक पोलीस स्टेशनमध्ये पोहचले तेव्हा तिथे एकही पोलीस नव्हता. काही पोलीस वरच्या मजल्यावर झोपले होते, त्यांना उठवून माहिती दिली असता त्यांनी नागरिकांवरच संताप केला होता. कोणी जखमी अवस्थेत पडला असेल तर रुग्णवाहिकेला कळवा, इकडे का आलात? असा त्यांचा सवाल होता.
दरम्यानच्या काळात पोलीस यंत्रणेकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मी स्वतः सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांना पहाटे ३ वाजता फोन केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी पहाटे नंतर पोलीस दोन पोलीस आले. कठाळे यांनी दुसऱ्या दिवशी १२ वाजता प्रतिसाद दिला. आपल्या व्यवस्था किती तत्पर आहे, यावरून अंदाज यावा.
या दरम्यान माझी कन्या त्या परदेशी तरुणाशी संवाद साधत होती. त्याच्याशी बोलत होती. त्याला तिने विचारले असता तो स्टॉकहोमचा असल्याचे म्हणाला. यावरून तो स्वीडनचा असण्याचा शक्यता आहे. जखमी अवस्थेत पडून सव्वा तास झाला होता. तो प्रवण म्हणून बोलत होता. शिवाय त्याच्या हातावर मेहंदी होती. त्यामुळे तो एखाद्या मित्रांच्या लग्नसोहळ्यासाठी तो भारतात आला असावा. त्याच्या पोशाखावरून तो कुठल्या तरी समारंभातून आला होता, असे वाटत होते.
पहाटेच्या सुमारास नंतर एक पोलीस उपनिरीक्षकही तिथे आले. त्यांना घटनेनेचे गांभीर्य आणून दिले. हा प्रकार वेगळा दिसतोय, त्याला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे त्यांना सांगितले. त्या उपनिरीक्षकाचे म्हणणे होते, काय नाही साहेब त्याच्या नाकाचा घुना फुटला असेल. या अधिकाऱ्याचा निष्कर्ष कीव आणणारा होता. कारण त्याचे कपडे रक्ताने माखले होते. लिफ्टमधे रक्ताचा सडा पडला होता. पायऱ्यांवर रक्त पडले होते. एवढा प्रचंड रक्तस्त्राव पाहूनही त्या अधिकाऱ्याची अनास्था संताप आणणारी होती.
पोलीस या घटनेविषयी बिलकुल गंभीर नव्हते. त्या परदेशी तरुणाच्या शरीरातून अगोदरचा मोठा रक्तस्त्राव झाला होता. त्यात त्याला पोलिसांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास रुग्णालयात नेले खरे, पण त्याच्यावर प्रत्यक्ष उपचाराला सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात आली. म्हणजे रुग्णालयातही ठोस उपचाराविना तो सहा तास पडून होता. त्याचे येथे कोणीच नव्हते. त्यामुळे माणुसकीच्या आग्रहाखातर पोलिसांनी तत्काळ उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे आग्रह धरणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही.
त्याला रुग्णालयात दाखल करुन पोलीस आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. जेव्हा सकाळी १० च्या सुमारास त्याला तपासायला घेतले तेव्हा कळले की त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला तातडीने मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नव्हता, तर भारतीय व्यवस्थेने केलेला खून आहे. स्वदेशी असो अथवा परदेशी येथे महत्वाचा नाही, मानवी जीव महत्वाचा आहे. त्याला वाचवण्यासाठी प्राधान्यक्रम असावा, पण दुर्दैवाने भारतीय व्यवस्थेला काहीही पडलेले नाही. रुग्णालय किंवा सरकारी व्यवस्थेविरुद्ध उद्रेकाची हीच अनास्था कारणीभूत आहे. असो, दुःख इतकेच वाटते की पोलिसांवर विसंबून न राहता मी त्याचासोबत रुग्णालयात गेलो असतो तर डॉक्टरांवर उपचारासाठी दबाव आणू शकलो असतो. कदाचित तो आज जिवंत असता. या घटनाक्रमातील पोलिसांपासून डॉक्टरांपर्यंत प्रत्येक घटक आरोपी आहे, त्यांना शासन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचे निश्चित केले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.