नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकासा एअरची सेवा सुरु होणार, भारतातल्या चार शहरांना जोडणार


नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अकासा एअरची सेवा लवकरच सुरु होणार आहे. अकासा एअरनं 25 डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरुन सेवा सुरु करणार असल्याची माहिती दिली. नवी मुंबई विमानतळावरुन अकासा एअरच्या विमान सेवेद्वारे चार शहरांशी जोडलं जाईल. अकासा एअरचं पहिलं विमान 25 डिसेंबरला दिल्ली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर गोवा, कोची आणि अहमदाबाद या शहरांना विमान सेवेनं जोडलं जाईल.

Akasa Air :  नवी मुंबई विमानतळावरुन अकासा एअरची सेवा सुरु होणार

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमान सेवेला प्रारंभ होईल. अकासा एअरच्या माहितीनुसार आगामी काळात 300 देशांतर्गत आणि  50 आंतरराष्ट्रीय उड्डाण  एका आठवड्यात करण्यात येणार आहेत. विस्तारीत रणनीतीचा भाग म्हणून अकासा एअरकडून 10 पार्किंग बेसचं सेटअप आर्थिक वर्ष 2027 च्या अखेरपर्यंत केलं जाईल. आंतरराष्ट्रीय विस्तार करण्याच्या योजनेचा तो एक भाग आहे. त्याद्वारे मध्य यूरोप आणि दक्षिण आशियामध्ये सेवा वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सेवा सुरु केल्यानंतर अकासा एअरचा विमानसेवेतील वाटा वाढणार आहे.  पश्चिम भारतात कंपनीची विमान सेवा वाढणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं होतं. या विमानतळाच्या उभारणीसाठी 19650 कोटींचा खर्च आहे.

दि.बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यास मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच नाव देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिल्याचं म्हटलं होतं. या नावाला मंजुरी द्यावी अशी विनंती नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती, त्यांनी सकारात्म प्रतिसाद दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनापूर्वी सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत बोलताना दिली होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबर महिन्यात झालं आहे. पाच टप्प्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर दोन रनवे आणि चार टर्मिनल उपलब्ध असतील. एका वर्षात 90 दशलक्ष प्रवाशांना पूर्ण क्षमतेनं विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर या विमानतळावर प्रवास करता येईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 1160 हेक्टरवर उभारलं जात आहे. अदानी एअरपोर्टस होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडकोकडून संयुक्तपणे या विमानतळाची उभारणी केली जातेय.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सेवा सुरु झाल्यानंतर कमी होणार आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.