1958 च्या पिवळ्या ‘फिएट कार’सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walase patil) यांनी एक मजेशीर आणि तितकीच भावनिक आठवण शेअर केली आहे. विशेष म्हणजे ही आठवण शेअर करताना त्यांनी राजकारण आणि समाजकारणाचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे, त्यांच्या पोस्टमधून तर्कवितर्क लावले जात आहेत, अनेकजण आपल्या परीने अर्थ काढत आहेत. मात्र, त्यांच्या या पोस्टची समाजमाध्यमांवर आणि राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा होत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते तथा महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून सर्वांना परिचित असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी फेसबुकवरुन पिवळ्या रंगाच्या फिएट गाडीचा फोटो शेअर करत भावनिक संदर्भ दिला आहे. या पोस्ट मध्ये एका गाडीचा संदर्भ देत त्यांनी; एखादी व्यक्ती जर आपल्या विचारांची, मूल्यांची आणि कामाची जपणूक करत राहिली, तर वय काहीही असो, ती व्यक्ती तितक्याच जोमाने, आत्मीयतेने आणि ताकदीने समाजासाठी काम करत राहू शकते. अशी मांडणी केली आहे. त्यामुळे, त्यांनी ती पोस्ट स्वत: संदर्भाने केलीय की, इतर कुठल्या नेत्याबाबत याची चर्चा होत आहे.
दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट
मुंबईतील जिमखान्यात काल व्यायामासाठी गेलो असताना चालता चालता उभ्या असलेल्या एका जुन्या Fiat गाडीवर माझं लक्ष गेलं. बारकाईने पाहिलं असता कळलं की ती गाडी 1958 साली बनवलेली आहे आणि आजही, तब्बल 68 वर्षांनंतर, ती अत्यंत उत्तम स्थितीत सेवेत आहे. एखादी गोष्ट योग्यप्रकारे जपली, व्यवस्थित मेंटेन ठेवली, तर ती कित्येक वर्षे उत्तम चालू राहू शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्या गाडीच्या मालकाने केलेली जपणूक आणि काळजी खरंच प्रेरणादायी आहे, असे वळसे पाटील यांनी म्हटलंय. तसेच हाच विचार राजकारण आणि समाजकारणालाही लागू होतो, अशी सूचक लाईन देखील त्यांनी आपल्या पोस्टमधून दिलीय.
वय काहीही असो..
जसं 68 वर्षं जुनी गाडी आजही सक्षमपणे चालू राहू शकते, तसंच एखादी व्यक्ती जर आपल्या विचारांची, मूल्यांची आणि कामाची जपणूक करत राहिली, तर वय काहीही असो, ती व्यक्ती तितक्याच जोमाने, आत्मीयतेने आणि ताकदीने समाजासाठी काम करत राहू शकते. कारण सातत्य, शिस्त आणि जपलेली मूल्यं यांवरच दीर्घकाळ टिकणारं आणि प्रभावी कार्य उभं राहतं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.