मी राजीनामा देणार नाही, सुनेत्रा पवारांचे ओएसडी आले होते, पण..; इद्रीस नायकवाडींनी सांगितलं
मुंबई : राज्यपाल नियुक्त केले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नायकवाडी यांना पक्षाकडून राजीनामा देण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे. मात्र, मला पक्षाकडून किंवा कुठल्याही नेत्याकडून तसं सांगण्यात आलं नाही. तरीही उद्या पक्षाच्या बैठकीत मी याबाबत चर्चा करेल असे स्पष्टीकरण आमदार इद्रीस नायकवाडी यांनी दिले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार असताना मधेच राजीनामा द्यावा लागेल अशा कधी चर्चाही झाल्या नव्हत्या. मला आमदारकी देताना त्यांनी सांगितलं होतं, ही संधी एकदाच आहे. आता, विधानसभेच्या तयारीला तुम्ही लागा, कारण भविष्यात विधानसभा लढवायची आहे, असेही नायकवाडी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
पक्षाकडून मला अद्याप राजीनाम्याबाबत सांगितलेलं नाही, प्रत्येक पक्षात असे काही लोक असतात जे अशा प्रकारे चर्चा करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक आहे. मी नक्कीच या चर्चांबाबत बोलेल, असे म्हणत आपण राजीनामा देणार नसल्याचे इद्रीस नायकवाडी यांनी एबीपी माझाशी संवाद साधत म्हटले. तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी माझ्याकडे आले होते. माझा हात फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा कोल्हापूर भागात ते होते म्हणून भेटायला आले होते, असे स्पष्टीकरणही नायकवाडी यांनी दिले.
महापौरपदाचा राजीनामा, जुनी आठवण
राजीनामा मागण्याबाबत एक प्रसंग घडला होता. सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेचा महापौर असताना मला राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता त्यावेळी नेतृत्वाला मी राजीनामा देणार नाही हे स्पष्ट केलं होतं. मुळात त्यावेळी मी स्थानिक आघाडी करून 48 नगरसेवक निवडून आणले होते आणि महापौर झालो होतो त्यामुळे राजीनामा देणार नसल्याचं सांगितल होतं.
अजित पवारांमुळे आमदारकीची संधी
इद्रीस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांनी अल्पसंख्यांक चेहरा म्हणून इद्रीस नायकवाडी यांना विधानपरिषद आमदारकीची संधी दिली होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर आता पक्षातील नेतृत्वाकडून त्यांना राजीनामा मागितला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहायक इद्रीस नायकवाडी यांना भेटल्याचे समजते.
कोण आहेत इद्रीस नायकवडी?
अहो इद्रिस नायकवडी सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेचे माजी महापौर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. दिवंगत नेते अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यपाल नियुक्त कोट्यातून 15 ऑक्टोबर 2024 ला त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आले होते. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून अल्पसंख्यांक चेहरा म्हणून त्यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नायकवाडी यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अल्पसंख्याक समाजात नायकवडी यांच योगदान आणि महत्व आहे. त्यामुळेच, त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली होती.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.