कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? NCRB च्या आकडेवारीवरून जयंत पाटलांचा महायुतीवर निशाणा

महाराष्ट्रात भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी आत्महत्यांसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील हे चित्र अतिभयंकर असून एनसीआरबीने याबाबत धक्कादायक माहिती उघड केली आहे. या आकडेवारीनुसार अत्याचार, भ्रष्टाचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारला धारेवर धरले आहे.

जयंत पाटील यांनी X वर पोस्ट शेअर करत भाजप सरकारवर निशाणा साधला. देशात 17 राज्यांमध्ये भाजपचे सरकार असताना महाराष्ट्राची ही स्थिती चिंताजनक असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. एवढ्या राज्यात भाजपचं सरकार असूनही महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यामध्ये पहिला तर महिला अत्याचारात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावरून एकच प्रश्न विचारावासा वाटतोय, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

जयंत पाटील यांनी गंभीर आकडेवारी मांडली. महाराष्ट्रात वर्षभरात 3824 शेतकरी आत्महत्या झाल्या असून आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच गेल्या वर्षभरात महिला अत्याचाराच्या 47954 घटना घडल्या असून यामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ शेतकरी प्रश्नावरच नव्हे तर, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारची कोंडी केली. ज्या भ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पीएचडी केली आहे, तिथेही 721 प्रकरणांसह महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असल्याचे सांगत याबाबत रोष व्यक्त केला.

सत्ताधाऱ्यांनी “मंगल देशा, पवित्र देशा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राची ओळख साफ पुसून टाकली आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. विधिमंडळात विरोधक म्हणून आम्ही वारंवार या विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. पण सरकारकडून कधीही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. सरकारला काहीही सांगा सरकारचं कायम एकच उत्तर असतं ALL IS WELL! असे म्हणत जयंत पाटील यांनी आपल्या ट्वीटमधून निशाणा साधला.

Comments are closed.