पेट्रोल पंपांवरील स्कॅनरद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चारचाकी आणि मोबाईलसह ९ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

पेट्रोल पंपांवर बनावट स्कॅनरद्वारे ग्राहकांची आणि पंप चालकांची फसवणूक करून रक्कम लाटणाऱ्या टोळीचा नांदेड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन, पाच मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल ९ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर पोलीस ठाण्यात २१ एप्रिल २०२६ रोजी व्यापारी शेख मसुद शेख अब्दुल रशीद (वय ४५, रा. गडीगल्ली, देगलूर) यांनी तक्रार दिली होती. २० एप्रिल २०२६ रोजी आणि त्यापूर्वी त्यांच्या मालकीच्या ‘ए. आर. अफसरा’ पेट्रोल पंपासह जयश्री प्रभाकर पेट्रोलियम (नरसी, ता. नायगाव), अक्षय पेट्रोलियम (बिजूर, ता. बिलोली), सिद्धेश्वर पेट्रोल पंप (वझरगा, ता. देगलूर), शिवांक हायवे पेट्रोल पंप (अटकळी, ता. बिलोली) आणि व्यंकटेश्वरा पेट्रोल पंप (देगलूर) या पंपांवरील स्कॅनरवर काही इसमांनी पैसे पाठवल्याचे भासवून, त्या बदल्यात रोख ६ लाख २४ हजार ८०८ रुपये घेऊन फसवणूक केली होती. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. ही टोळी देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती मिळताच, सायबर पोलीस आणि देगलूर पोलिसांनी सापळा रचून टोळीतील एकाला जेरबंद केले. त्यानंतर अधिक तपासाअंती एका आरोपीला निजामाबाद (तेलंगणा) येथून, तर मुख्य सूत्रधाराला पुणे येथून अटक करण्यात आली.

या प्रकरणी अल्ताफ पि. सरवर आत्तार (२३) व्यवसाय ड्रायव्हर रा. धुळा (मोठा) मंडल जुक्कल जि. कामारेड्डी, योगेश उत्तम पांचाळ (२६) रा.धुळा मोठा तहसील जुक्कल जिल्हा कामारेड्डी राज्य तेलंगणा, तौफीक अश्रफ शेख (२३) रा. जालना ह.मु. अ‍ॅकोरा पॅराडाईन, रूम नं. ८०२ पांडवनगर, चतुः श्रृंग्री, पुणे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक चारचाकी वाहन, पाच मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) अदिती पोटे आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सायबरचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, राजेंद्र सिटीकर, विलास राठोड, दीपक, अविनाश ढोके, दावीद पिंडगे, काशिनाथ कारखेडे आणि ज्ञानेश्वर यन्नावार यांचा सहभाग होता.

नांदेड जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद व्यक्ती किंवा स्कॅनर आढळल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

Comments are closed.