…बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना आवाहन करताना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं सूचवलं आहे. तसेच, सार्वजनिक वाहने वापरा, शहरात मुख्यत्वे: मेट्रोला प्राधान्य देण्याचेही मोदींनी सांगितले. त्यावरुन, आता टीका-टिपण्णी सुरू झाली असून सत्ताधाऱ्यांनी या आवाहनाचं कौतुकही केलंय. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई भाजपच्या अध्यक्षांनाच मोदींच्या या आवाहनाचा विसर पडल्याचं दिसून आलं. भाजपच्या मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit satam) यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात तब्बल 25 गाड्यांचा ताफा एकामागून एक धावल्याचं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं. त्यावरुन, साटम यांना खोचक टोलाही लगावला. त्यामुळे, अमित साटम आणि रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना अमित साटम यांनी जोरदार टीका केली. रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातील होत्या, असे भासवण्याचा तुमचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. आज मुंबई शहरातील नालेसफाईची अधिकृत पाहणी सुरू होती. या पाहणी दौऱ्यात सहपालकमंत्री, आमदार, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ताफ्यात 7-8 गाड्या नक्कीच होत्या, मात्र रस्त्यावरील सर्वच वाहने आमच्या ताफ्यात असल्याचे दाखवून ’25 गाड्यांचा ताफा’ असल्याचा बनाव तुम्ही करत आहात. आम्ही सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन मुंबईची सेवा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी 21 व्या वर्षी बारामती ऍग्रो सारख्या कंपनीचा सीईओ झालो नाही, तर संघर्षातून इथवर आलो आहे, असे म्हणत अमित साटम यांनी रोहित पवारांना डिवचलं. तसेच, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आम्हाला शिकवण देण्याची अजिबात आवश्यकता नाही, असा टोलाही लगावला होता. आता, अमित साटम यांच्या टीकेवर रोहित पवारांनी पुन्हा पलटवार केला आहे.
बाकी ज्ञान कशाला पाजळता? – रोहित पवार
प्रिय अमित साटम जी, तुमच्या राजकीय प्रगतीचा आदर आहे आणि तुम्ही पुढे जावे यासाठी मनापासून सदिच्छा देखील आहेत. माझ्या संदर्भात बोलायचे झाले तर ईडीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकण्याचा प्रयत्न होऊनही आपल्या पक्षाचा झेंडा न घेता आजही संघर्षाची भूमिका घेत ठामपणे विचारांसाठी उभा आहे. त्यावरून तुमच्या लक्षात सर्वकाही आलंच असेल, असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, मी तुमच्यासारखं विषयांतर करणार नाही, म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा पंतप्रधानांच्या तसेच फडणवीस साहेबांच्या आवाहनाला तुम्ही केराची टोपली दाखवली हे मान्य करा. बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? असा शब्दात रोहित पवारांनी अमित साटम यांच्यावर पलटवार केला.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.