NEET चा पेपर 15 लाखांना विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ‘असं’ केलं जेरबंद; हेअरस्टाईल बदलली तरी ‘बा

नाशिक नीट पेपर लीक : देशभरातील 22 लाख 29 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक खुलासा झाला आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे समोर आले असून नाशिकमधून (Nashik) नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला, येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेने 30 वर्षीय संशयित शुभम खैरनार याला अत्यंत नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या आहेत. ओळख लपवण्यासाठी आरोपीने चक्क टक्कल केले होते, मात्र नाशिक पोलिसांच्या ‘बाझ’ नजरेतून तो वाचू शकला नाही.

Nashik Neet Paper Leak: असा झाला अटकेचा थरार

राजस्थान सीबीआय आणि पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने ही कारवाई केली. शुभम खैरनार हा मूळचा नांदगावचा रहिवासी असून तो नाशिकमध्ये बी.ए.एम.एस. (BAMS) च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तपासादरम्यान पोलिसांना त्याचे नाव मिळाले होते, मात्र पत्ता नव्हता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला.

पोलिसांपासून वाचण्यासाठी शुभमने चक्क आपले संपूर्ण केस कापून टक्कल केले होते आणि कपडेही बदलले होते. मंगळवारी तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी रस्त्यातच सापळा रचला. सुरुवातीला नवीन ‘लूक’मुळे तो ओळखू आला नाही, मात्र पोलीस अंमलदारांनी त्याला शिताफीने ओळखले आणि अवघ्या एक तासात त्याला ताब्यात घेतले.

Nashik Neet Paper Leak: 10 लाखांचा पेपर 15 लाखांना विकला

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, 1 मे रोजीच हा पेपर फुटला होता. शुभम खैरनारने 10 लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि ती पुढे 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे. या व्यवहारानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामवर लीक झाली आणि 22 लाख विद्यार्थ्यांचे कष्ट वाया गेले.

Nashik Neet Paper Leak: नाशिक ते हरियाणा: असा झाला प्रवास

नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमध्ये लीक झाली, तिथून ती हरियाणात पोहोचली. हरियाणात या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले आणि त्यानंतर बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरपर्यंत ही साखळी पसरली. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले असून राजस्थानचा मनीष हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जात आहे.

Nashik Neet Paper Leak: विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द केली असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र तेच राहणार असून त्यांना नवीन हॉल तिकीट दिले जाईल. मात्र, एका मोजक्या लोकांच्या हव्यासापोटी लाखो विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

आणखी वाचा

Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

आणखी वाचा

Comments are closed.