WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर! बांगलादेशने पाकिस्तानला लोळवलं, भारताचं समीकरण बिघडलं

BAN वि PAK नंतर WTC ने पॉइंट टेबल अपडेट केले: आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत इतिहास रचला. मंगळवारी ढाक्यातील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशने दमदार विजय मिळवला. वेगवान गोलंदाज नाहिद राणाने पाच विकेट घेत पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर आणले. या विजयामुळे WTC गुणतालिकेतही मोठे बदल झाले असून भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

बांगलादेशने पाकिस्तानला लोळवलं

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या शानदार शतकाच्या जोरावर 413 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून अझान अवैस याने शतक झळकावले, मात्र संपूर्ण संघ 386 धावांवर आटोपला. पहिल्या डावात 27 धावांची आघाडी घेतल्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात 9 बाद 240 धावा करून डाव घोषित केला आणि पाकिस्तानसमोर 268 धावांचे लक्ष्य ठेवले.

हे आव्हान पेलताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 163 धावांत कोसळला. बांगलादेशसाठी मेहदी हसन मिराज आणि नाहिद राणा हे विजयाचे खरे शिल्पकार ठरले. दोघांनी मिळून प्रत्येकी 6 विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडला. कर्णधार शांतोला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर बांग्लादेशचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. या पराभवानंतर पाकिस्तान मालिका 0-1 ने पिछाडीवर गेला आहे. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 16 मेपासून सिल्हटमध्ये खेळवला जाणार आहे. जर बांग्लादेशने तो सामनाही जिंकला, तर WTC गुणतालिकेत मोठी झेप घेत तो भारतालाही मागे टाकू शकतो.

बांगलादेशचा फायदा, पाकिस्तानचे नुकसान

बांगलादेश गुणतालिकेत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांची विजयाची टक्केवारी (PCT) 16.67 वरून 44.44 पर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, तीन सामन्यांतील दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान पाचव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. त्यांचे गुण12 वर कायम आहेत, परंतु पराभवांच्या वाढीमुळे त्यांची विजयाची टक्केवारी (PCT) 50.00 वरून 33.33 पर्यंत घसरली आहे.

भारतीय संघ पाचव्या स्थानावर पोहोचला

बांगलादेशच्या विजयाचा फायदा भारतीय संघाला एकही सामना न खेळता झाला आहे. किंबहुना, पाकिस्तानच्या घसरणीचा फायदा भारताला झाला असून, भारताने एक स्थान वर चढून पाचवे स्थान पटकावले आहे. भारताने या फेरीत नऊ सामने खेळले असून, त्यात चार जिंकले आणि चार गमावले आहेत, आणि त्यांचे 52 गुण आहेत. भारतीय संघाचा पीसीटी 48.15 आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या गुणांमध्ये कोणताही बदल झाला नाही, परंतु ते एका स्थानाने घसरून आठव्या स्थानावर आले आहेत. इंग्लंडने आपल्या 10 सामन्यांपैकी केवळ तीन सामने जिंकले आहेत. त्यांचे 38 गुण असून पीसीटी 31.67 आहे.

भारताचा पुढील कसोटी सामना 6 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा आणि मग बॉर्डर-गावस्कर चषक खेळणार आहे. दुसरीकडे बांग्लादेश सध्या आठव्या स्थानावर असला तरी सलग दुसरा विजय मिळाल्यास समीकरण पूर्णपणे बदलू शकते.

हे ही वाचा –

IND vs AFG Test Squad : शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब

आणखी वाचा

Comments are closed.