मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ

मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. नुकत्याच सुरू असलेल्या राष्ट्रवादीतील घडामोडी, सुनील तटकरे यांचे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नसल्याच्या बातम्यानंतर ही भेट होत असल्याने त्याला महत्व प्राप्त झालं आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली ही पहिलीच भेट असल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना त्याला सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा विरोध असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आज सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली.

Sunil Tatkare On Sharad Pawar :  साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो, तटकरेंची प्रतिक्रिया

शरद पवार साहेबांची तब्येत गेली काही दिवस ठिक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली होती. आज साहेबांना वेळ होती, त्यामुळे मी त्यांना आज भेटायला आलो असल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. शरद पवारांच्या भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नाही, कोणतंही राजकारण नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.

Sunil Tatkare Meet Sharad Pawar : भेटीच्या टायमिंगमुळे चर्चा

पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचा दावा जरी सुनील तटकरे यांनी केला असला तरी या भेटीच्या टायमिंगमुळे मात्र त्याची चर्चा सुरू आहे. सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिवपद आहे, तर प्रफुल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय कार्याध्यक्षपद आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रामध्ये तसा उल्लेख नव्हता. त्यामुळे हे दोन्ही नेते आता या पदावर आहेत की नाही अशी चर्चा रंगली होती.

हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आसामचा एकत्रित दौरा केला. राष्ट्रवादीमध्ये तसा काही वाद नाही हे दाखवण्याचा प्रयत्न त्यातून केला जात होता का अशाही चर्चा सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने आता त्याची वेगळी चर्चा रंगली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.