नीटसह अन्य स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकार फास्ट ट्रॅकवर; हायकोर्टाकडून छत्रपती संभाजी नगर, नागपुरात दोन महानगर दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती
नीटसह अन्य स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारची जलगदगतीने सुनावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली आहे. येथील महानगर दंडाधिकारी यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विधी व न्याय मंत्रालयाने हिंदुस्थानातील सर्व उच्च न्यायालयांना तसे आदेश जारी केले. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना केली.
छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. व्ही. पवार यांची फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली असून नागपूर येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी गुलशन कोलते यांच्याकडे विशेष न्यायाधीशाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पाच वर्षांपर्यंत शिक्षा, एक कोटी दंड
पेपर फोडणे, परीक्षांमध्ये गैरप्रकार करणे यासह अन्य गुन्ह्यांसाठी तीन ते पाच वर्षांपर्यंत कारावास व दहा लाखांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. हा संघटित गुन्हा असल्याचे स्पष्ट झाल्यास त्या संस्थेला एक कोटी दंड व परीक्षा खर्च वसूल केला जावा, असेही या कायद्यात नमूद आहे.
Comments are closed.