सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणा

NEET पेपर लीक: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘युजी नीट’ परीक्षेच्या पेपरफुटी (NEET Paper Leak) प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. धनंजय लोखंडे हा नीट परिक्षा घोटाळ्यातील महत्वाचा सुत्रधार असल्याचे समोर येत असून तो वेगवेगळ्या शहरातील एजंटमार्फत नीटची प्रश्नपत्रिका विकत होता. त्यासाठी त्याने एजंट म्हणून काही विद्यार्थ्यांचा वापर केल्याचे समजते.

NEET Paper Leak: सायबर सिक्युरिटीचा विद्यार्थी अटकेत

पुण्यातील फुरसुंगी भागातून शेषराव सोळंकी नावाच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, शेषराव हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा’ (Cyber Security) या विषयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. ज्या हातांनी सायबर गुन्हे रोखणे अपेक्षित होते, त्याच हातांनी धनंजय लोखंडेच्या सांगण्यावरून पेपर विकत घेणारे विद्यार्थी शोधणे आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करण्याचे काम केले. परीक्षेच्या चार दिवस आधीच सोळंकीने विद्यार्थ्यांशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते, असे त्याच्या मोबाईल संभाषणातून स्पष्ट झाले आहे.

NEET Paper Leak: ब्युटी पार्लरच्या आडून रॅकेट

या घोटाळ्याचे धागेदोरे पुण्याच्या बिबवेवाडी भागापर्यंत पोहोचले आहेत. येथे ब्युटी पार्लर चालवणारी मनिषा वाघमारे गेल्या तीन वर्षांपासून धनंजय लोखंडेच्या संपर्कात होती. ती लोखंडेसाठी एजंट म्हणून काम करत असून, गरजू विद्यार्थ्यांना शोधून त्यांना प्रश्नपत्रिका विकण्याचे काम ती करत होती.

NEET Paper Leak: नाशिकचा शुभम खैरनार आणि ‘टक्कल’ करून पलायनाचा प्रयत्न

तर नाशिकच्या इंदिरानगर भागातून शुभम मधुकर खैरनार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभम हा ‘बीएएमएस’च्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून करिअर कौन्सलर म्हणून काम करत होता. त्याने कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिका संच हरियाणातील गुरुग्राम येथे पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी शुभमने चक्क टक्कल केले होते आणि तो देवदर्शनाच्या बहाण्याने पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, नाशिक पोलिसांनी दीड तासात शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या.

NEET Paper Leak: पुढील तपास सीबीआयकडे

धनंजय लोखंडे हा पुण्याच्या वाघोली भागात राहून हे संपूर्ण रॅकेट चालवत होता. या प्रकरणात आतापर्यंत 16 संशयितांची नावे समोर आली आहेत. राजस्थानच्या ‘एसओजी’ पोलिसांनी सुरु केलेल्या या तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती मोठ्या नावांचा समावेश आहे, हे सीबीआयच्या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat Case: अशोक खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी; 105 साक्षीदारांचे जबाब आणि 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल

आणखी वाचा

Comments are closed.