मुंबईतील 60 यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती, नेपाळ सरकारचा कुटुंबीयांशी संपर्क; ‘मिसिंग’ची तक्रार करण्याचे आवाहन
नेपाळमधील महापुरानंतर तिथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील 404 पर्यटकांपैकी 66 जणांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. यात मुंबईहून कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या 60 जणांचा समावेश असून हा संपूर्ण ग्रुप नेपाळ-चीन सीमेवरील इमिग्रेशन बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्य सरकारच्या आपत्कालीन कार्य केंद्राकडे महापुरात अडकलेल्या एकूण 404 पर्यटकांची नोंद आहे. आतापर्यंत 338 जणांचा ठावठिकाणा लागला आहे. त्यातील बहुतेक पर्यटक मायदेशी परतले आहेत. तर 66 जण अजूनही बेपत्ता आहेत. मुंबईतील 60 यात्रेकरूंचा गट यात आहे. हे साठही जण डॉ. मिलिंद चितळे यांच्या ‘हिल्स अँड ट्रेल्स’ या टूर कंपनीच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रेला गेले होते. ज्या दिवशी पूर आला, त्या दिवशी 26 ऑगस्ट रोजी हे सगळे इमिग्रेशन इमारतीमध्ये होते. या इमारतीत एकूण 600 लोक होते. ही संपूर्ण इमारतच महापुरात गडप झाली. त्यानंतर यापैकी कोणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही. या इमारतीच्या ठिकाणी 60 फूट उंच चिखलाचा ढिगारा आहे. हे 60 यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. नेपाळी लष्कर आणि सर्व यंत्रणा युद्धपातळीवर त्यांचा शोध घेत आहेत
नेपाळ सरकारचा कुटुंबीयांशी संपर्क
नेपाळ सरकारने या पर्यटकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून हिंदुस्थानातील स्थानिक पोलीस ठाण्यात ’मिसिंग’ची तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती रीचा ट्रव्हल्सने दिली आहे.
आम्ही आशा सोडलेली नाही!
अंधेरी येथील डॉ. मिलिंद चितळे यांच्यासह त्यांची पत्नी जान्हवी तसेच हिंदुजा रुग्णालयातील ट्रान्स्फयुजन मेडिसीन विभागातील प्रसिद्ध डॉ. आनंद देशपांडे व त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे यांचा बेपत्ता पर्यटकांमध्ये समावेश आहे. ’आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. दैवी चमत्काराची आस लावून आहोत,’ अशी भावना डॉ. चितळे यांची बहीण मंजिरी यांनी व्यक्त केली.
कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेले 106 यात्रेकरून रविवारी नागपुरात सुरक्षित पोहोचले.
Comments are closed.