पेणच्या कारागिरांनी साकारले 38 लाख बाप्पा; 300 कोटींची उलाढाल, अतिवृष्टीच्या विघ्नावर केली मात

छाया : प्रदीप धिवार

राजेश प्रधान, पेण

जुलैमध्ये आलेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका पेणमधील गणेशमूर्ती कारखानदारांनाही बसला. कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अतिवृष्टीच्या या विघ्नावर मोठ्या धैर्यांने मात करून येथील कारागिरांनी यंदा 38 लाख बाप्पा साकारले आहेत. कारागिरांनी दिवस-रात्र मेहनत करून विविध प्रकारच्या आकर्षक गणेशमूर्ती बनवल्या असून पेणच्या बाजारपेठेत यंदा 300 कोटींची उलाढाल झाली आहे. विघ्नहर्त्या गणरायानेच आमचे विघ्न दूर  केल्याची भावना मूर्तिकार व कारखानदारांनी व्यक्त केली आहे.

रायगड जिह्यात जुलैमध्ये ढगसदृश अतिवृष्टी झाली होती. त्याचा सर्वाधिक त्रास पेणमधील गणेशमूर्ती कारखानदारांना सहन करावा लागला. माती, रंग, मूर्त्या तसेच अन्य साहित्य पाण्यात गेल्याने फार मोठा तोटा झाला. हमरापुर विभागातील तांबडशेत, जोहे, हमरापूर, कळवे, उर्णेली, सोनखार, सापोली या विभागात सुमारे 600 गणेश मूर्ती कारखाने आहेत. त्यापैकी सुमारे 150 कारखान्यांना या पूर परिस्थितीचा फटका बसला होता. पण धैर्याने या संकटाला सर्वजण सामोरे गेले आणि त्यांनी नव्या दमाने पुन्हा मेहनत केली.

संपूर्ण पेण तालुक्यात गणेशमूर्तींचे सुमारे 1 हजार 700 कारखाने आहेत. बोलके डोळे, आकर्षक रंगसंगतीमुळे पेण तालुक्यातील गणेशमूर्तींना देशातील विविध राज्यांसह परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षी लालबागचा राजा, चिंतामणी, मोरेश्वर, अष्टविनायक, दगडूशेठ हलवाई, टिटवाळा, पेशवाई, शिवरेकर, गरुडावर स्वार बाप्पा, खेकड्यावर स्वार बाप्पा यासह इतर विविध प्रकारच्या गणेशमूर्तींना ग्राहकांनी पसंती दिली आहे.

बँकांनी दिला मदतीचा हात

यंदाही राष्ट्रीयीकृत बँकांनी मदतीचा हात देत गणेशमूर्ती कारखानदारांना सुमारे 250 कोटींचा पतपुरवठा केला आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील गणेशमूर्ती उद्योगाची उलाढाल 300 कोटींची झाली आहे. तसेच शाडू माती, कारागिरांचा मोबदला, यासह विविध खर्च वाढल्याने यावर्षी गणेशमूर्तीच्या दरात 20 टक्के वाढ झाली आहे.

अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, थायलंड, दुबई, इंडोनेशिया, टेक्सास यासह इतर देशांतही बाप्पांच्या मूर्तींना मागणी असते. यावर्षी सुमारे सवा लाख गणेश मूर्ती परदेशात रवाना झाल्या असल्याची माहिती गणेशमूर्ती व्यावसायकार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी दिली.

देशातील विविध राज्यांमधील गणेश भक्तांच्या घरात पेणचे बाप्पा विराजमान होणार आहेत. 1500 रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंतच्या गणेशमूर्ती उपलब्ध असल्याची माहिती हर्षदा कला केंद्राचे (बोरगाव) गणेश मूर्तिकार अविनाश भोईर यांनी दिली.

भोईर यांच्या गणपती कारखान्यात त्यांची मुलगी हर्षदा, लीना, मुलगा आदित्या, पुतण्या मंथन यांच्यासह पत्नी व नातेवाईकांची मदत असते. त्यांच्या कारखान्यातून मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगर, फलटण येथे हजारो गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत.

Comments are closed.