पालिका मुख्यालयासमोर नवे भव्य सभागृह उभारणार; 30 कोटींचा खर्च, जिमखान्याच्या जागी सहा मजली इमारत
मुंबई महानगरपालिका फोर्ट येथील मुख्यालयाच्या समोरच 350 नगरसेवकांची बैठक व्यवस्था असणारे भव्य सभागृह उभारणार आहे. विधान भवनाच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या या सभागृहासाठी पालिका 30 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. तळमजला अधिक पाच मजल्यांच्या या इमारतीत पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर सभागृहाची व्यवस्था असेल.
पालिकेच्या फोर्ट येथील ऐतिहासिक हेरिटेज इमारतीत निवडून आलेले 227 आणि 10 स्वीकृत नगरसेवकांची बैठक व्यवस्था असणारे सभागृह आहे. मात्र या ठिकाणची बैठक व्यवस्था महासभेवेळी अपुरी पडल्याने गैरसोय होते. महासभेसाठी उपस्थित पालिका कर्मचारी, पत्रकारांना बसण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागी नवे सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फर्निचर, दोन मजल्यांना हेरिटेज लूक
- नव्या इमारतीचे बांधकाम आरसीसी तत्त्वावर करण्यात येणार असले तरी तळ आणि पहिल्या मजल्याला आणि फर्निचरला हेरिटेज लूक देण्यात येणार आहे.
- हेरिटेज कमिटी, सॉइल टेस्टिंगसारख्या पाच ते सहा परवानग्या मिळाल्यानंतर वर्षअखेरीस भूमिपूजन होणार आहे. पुढील दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अशी राहणार नव्या इमारतीची रचना
- बेसमेंटमध्ये 60 कारसाठी पार्किंग व्यवस्था
- पाचव्या-सहाव्या मजल्यावर सभागृह
- सभागृहात ह्युविंग गॅलरी, व्हीआयपी बैठक व्यवस्था
- ग्राऊंड फ्लोअरवर हॉल आणि एंट्री लॉबी
- एकूण साडेसात हजार स्क्वेअर फूट बांधकाम
- महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्यांसाठी दालने
- प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यालये
- इकारलिफ्टसह दोन लिफ्ट, दोन जिने, स्टेअरकेस
- 16 दुकानांसाठी तळमजल्यावर इमारतीत जागा
नव्या सभागृहात पुढील काही वर्षांत वाढणारी नगरसेवकांच्या संख्येसह पालिका कर्मचारी, पत्रकार यांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था असेल. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्तांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून, स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे.
Comments are closed.