धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा, नाहीतर पोलिसांनी बांगड्या घालून घरी बसावं, काँग्रेस कार्य

पुणे भाजप काँग्रेस राधा: पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात मंगळवारी राजकीय तणाव शिगेला पोहोचला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून (BJP) आंदोलन सुरू असतानाच भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांवर प्रचंड संतापले असून, “धीरज घाटे आणि मंजुषा नागपुरेंना अटक करा, नाहीतर पोलिसांनी बांगड्या घालून घरी बसावं,” असा थेट इशारा देण्यात आला आहे.

काँग्रेस भवनाबाहेर भाजपचे कार्यकर्ते जवळपास दीड ते दोन तास आंदोलन करत होते. यावेळी घोषणाबाजी सुरू असतानाच दोन्ही बाजूंकडून समोरासमोर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्या असून, एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्याला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. या गोंधळात काही पोलिस कर्मचाऱ्यांनाही दगड लागल्याची माहिती समोर आली आहे.

Pune BJP Congress Rada: “पोलिसांनी भाजपला अभय दिलं” : काँग्रेसचा आरोप

काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की, काँग्रेस भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अभय दिलं. “दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी गर्दी तात्काळ पांगवली, मग इतका वेळ भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनासमोर थांबू का दिलं?” असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Pune BJP Congress Rada: मंजुषा नागपुरेंवरही कारवाईची मागणी

या आंदोलनात महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित होत्या. त्यामुळे काँग्रेसकडून “नागपुरे यांनाही अटक झाली पाहिजे,” अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

Pune BJP Congress Rada: भाजप कार्यकर्त्यांचा काढता पाय

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्याचं डोकं फुटल्याची घटना घडल्यानंतर आणि वातावरण अधिक चिघळत असल्याचे लक्षात येताच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले.

Pune BJP Congress Rada: पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन

काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रशांत जगताप यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांविरोधात संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. “भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करा, नाहीतर फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसू,” असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला. यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांसह फरासखाना पोलीस ठाणे यांच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत बसले. “जोपर्यंत धीरज घाटे आणि मंजुषा नागपुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही,” असा ठाम इशारा अरविंद शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, पुणे शहरातील या घटनेमुळे राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, पुढील काळात या प्रकरणावरून काँग्रेस–भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

Pune BJP Congress Rada: गर्दीतून भिरकावलेला दगड आला अन् काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यात बसला, रक्ताची धार लागली, पुण्यातील काँग्रेस भवनासमोर भाजपचं आक्रमक आंदोलन

आणखी वाचा

Comments are closed.