मै सत्यनिष्ठा से… बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी, रचला नवा विक्रम
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून 243 जागांपैकी 202 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत येथे मोठा भाऊ बनल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर (chief minister) कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देशाला होता. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी 10 वेळा शपथ घेऊन सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री बनण्याचा नवा विक्रम रचला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात मोठ्या जनसमुदायासमोर हा शपथविधी संपन्न झाला.
नितीश कुमार यांनी 10 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळ येऊन नितीश कुमार यांचे अभिनंदन केले. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजप एनडीने निवडणुका लढवल्या. पण, सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. कारण, भाजपने महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या होत्या. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात 57 जागा जिंकता आल्या, तर भाजपने 132 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे, अर्थातच भाजपच महाराष्ट्रातही मोठा भाऊ ठरला. त्यानंतर, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनले, तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. त्यामुळे, आता बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाईल की नितीश कुमार यांना संधी मिळेल याची चर्चा होती. अखेर, नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आणखी वाचा
Comments are closed.