फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही : सर्वोच्च न्यायालय
24 तास आतिषबाजीची अनुमती नाही : सरकारने कालमर्यादा ठरवावी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फटाक्यांवरील बंदी हटविण्याच्या याचिकेवर सुनावणी केली आहे. पूर्ण देशात फटाक्यांवर बंदी घालणे शक्य नाही. पूर्ण बंदीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील. परंतु 24 तास आतिषबाजीची अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
फटाके फोडण्यासाठी वेळ निश्चित करावा लागेल, जेणेकरून सणही साजरा करता येईल आणि लोकांना त्रासही होणार नाही. सलग फटाके फोडण्यात आल्यास आजारी व्यक्ती, वृद्ध आणि मुलांवर याचा प्रतिकूल प्रभाव पडतो, असे न्यायाधीश एम.एम. सुंदरेश आणि पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
धार्मिक भावना, आरोग्य आणि पर्यावरणाशी निगडित चिंतांदरम्यान संतुलन कायम राखणे आवश्यक असल्याची टिप्पणी खंडपीठाने केली. फटाक्यांमधील बेरियमची तपासणी, डेसिबल पातळी निश्चित करणे आणि फायर टेस्टकरता खंडपीठाने केंद्र सरकार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला मुदत दिली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
ग्रीन फटाक्यांवर मर्यादित सूट
सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी एक प्रस्ताव सादर केला. यात काही खास ‘नेक्स्ट-जनरेशन जॉइंट ग्रीन क्रॅकर्स’ना मर्यादित आणि अटींसह सूट देण्यावर विचार करण्याचा मुद्दा नमूद आहे. हे फटाके कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-नॅशनल एनवायर्नमेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टीट्यूटच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहेत. हे नव्या फॉर्म्युल्याने निर्माण करण्यात आलेले फटाके असून यात उत्सर्जन कमी करण्यासाठी बेरियम सॉल्टचे प्रमाण घटविण्यात आले आहे. परवानाधारक उत्पादकांनी निर्माण केले असेल तरच या खास फटाक्यांना अनुमती दिली जाऊ शकते असे या प्रस्तावात नमूद आहे. या फटाक्यांची आवाजाची मर्यादा 125 डीबी(एआय)/145 डीबी(सी) निश्चित करण्यात आली आहे. यात प्रतिबंधित रसायनांचा वापर असू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.