आता मेघालयात 'ऑपरेशन लोटस'.
‘यूडीपी’चे आठ बंडखोर आमदार भाजपमध्ये सामील होणार
वृत्तसंस्था/ शिलाँग
ईशान्य भारतातील मेघालय या छोट्या राज्यात युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (यूडीपी) आठ आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहेत. मॉसिनरामचे आमदार ओलन सिंग सुइन यांनी शुक्रवारी याला दुजोरा दिला. भाजपमध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या आठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘यूडीपी’च्या तातडीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यूडीपी सध्या एनपीपीच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग आहे. या पक्षांतराचा राज्यावर लक्षणीय परिणाम होईल. सध्या मेघालय विधानसभेत ‘यूडीपी’चे 12 आमदार आणि भाजपचे दोन आमदार आहेत.
मेघालयात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन लोटस’ला मोठे यश मिळताना दिसत आहे. आमदारांच्या एका गटाचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याकडून पक्षबदलासंबंधीचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. ‘आम्ही भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहोत’, असे आमदार ओलन सिंग सुईन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, यासाठी त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापुढे काही अटी ठेवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘यूडीपी’ आमदारांशिवाय, पक्षाचे माजी नेते जेमिनो मॉथोह हेदेखील 12 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये सामील होत आहेत. जेमिनो यांनी अनेक वर्षे ‘यूडीपी’चे उपाध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून काम केले होते. त्यांनी मे महिन्यात आपल्या पक्षाचा राजीनामा दिला होता. भाजपमधील या पक्षप्रवेशामुळे राज्यात पक्षाला मोठी बळकटी मिळणार आहे.
Comments are closed.