आता अग्निवीरांना लग्नाला परवानगी?

नियमात बदल करण्याचे सरकारकडून संकेत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने अग्निवीरांच्या विवाहासंबंधीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. आता, चार वर्षांच्या सेवेनंतर दोन वर्षांची मुदतवाढ घेऊन अग्निवीर जवानांना विवाह करता येईल. मात्र, विवाह केवळ प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरच करता येईल. पूर्वी, अग्निवीर म्हणून सेवा बजावत असताना विवाहास परवानगी नव्हती. मात्र, आता ज्या अग्निवीरांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाल्यानंतर विवाह करण्याची परवानगी दिली जाईल. ही अग्निवीरांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक बाब आहे. विश्वसनीय सूत्रांचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी याला दुजोरा दिला असला तरी अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पूर्वी अग्निवीर भरतीच्या वेळी अविवाहित असले पाहिजेत असा नियम होता. शिवाय, ते त्यांच्या सेवेदरम्यान लग्न करू शकत नव्हते. पूर्वी, भरती फक्त चार वर्षांसाठी होती. तथापि, आता सेवेत मुदतवाढ मिळणाऱ्या अग्निवीरांना सुमारे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते, त्यानंतर ते लग्न करू शकतील.

रजेच्या नियमांमध्येही बदल होणार

अग्निवीरांच्या रजेच्या नियमांमध्येही बदल होऊ शकतो. अग्निवीरांना त्यांच्या दोन वर्षांच्या सेवेदरम्यान अधिक रजा मंजूर केली जाऊ शकते. पूर्वी त्यांना वर्षाला केवळ 30 रजा मंजूर केल्या जात होत्या, परंतु मुदतवाढीनंतर त्यांना वर्षाला 90 रजा मंजूर केल्या जाऊ शकतील. लष्कर सैनिकांच्या शिस्त आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवरही लक्ष ठेवेल. सरकार लवकरच या बदलांची अधिकृत घोषणा करू शकते.

Comments are closed.