निकालानंतर नाराज, ओमराजेंनी राजकीय भूमिका सांगितली; उद्धव ठाकरे अन् आदित्य यांच्याबद्दलही बोलले

मुंबई : गेल्या 4 दिवसांपासून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या राजकीय भूमिकेमुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच, आज त्यांच्या वडिलांच्या म्हणजे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणी न्यायालयाने (Court) निर्णय दिला. गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे, आजचा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्यासह कुटुंबीयांना धक्का मानला जातो. या निकालानंतर आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं. तसेच, राजकीय भूमिका देखील पुढील दोन दिवसांत जाहीर करू, मात्र मी उद्धव ठाकरे आणि आदित्यजींबद्दल काहीही बोललेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाचा निकाल ऐकला, राजकीय वैमनस्य होतं हे न्यायालयाने मान्य केलंय. राज्य पोलिसांवर तपासात त्रुटी होत्या, तत्कालीन गृहमंत्री पद्मसिंह पाटलांचा दबाव होता. त्यानंतर उच्च न्यायालयाकडे आम्ही याचिका दाखल केली, त्यानंतर तपास सीबीआयकडे वर्ग झाला. या दरम्यान तीन वर्षांचा कालावधी गेला. सीबीआयने बरेच परिश्रम घेतले. आता आज निकाल आलाय, त्याची कॉपी रात्री मिळेल. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. पण, प्रश्न हा पडलाय की पवनराजे साहेबांना मारलं कोणी? हा आमच्या कुटुंबासमोर प्रश्न आहे. शेवटी हे कलयुग आहे, कलयुगात कायम निराशा पदरी पडते, अशी भावनिक प्रतिक्रिया खासदार ओमराजेंनी सीबीआय न्यायालयाच्या निकालानंतर दिली. 20 वर्षे कशाला म्हणतात, हा संघर्ष कशाला म्हणतात. सर्व प्रक्रिया पार पाडल्यावर, दोषींवर कारवाई होईल असं वाटत होत. पण, शेवटी न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवायचा असतो, आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे अन् आदित्यजींबद्दल काहीही बोललेलो नाही

मी उद्धवजींबद्दल आणि आदित्य साहेबांबद्दल अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही. माझी भूमिका काहीही ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्य यांच्याबद्दल याआधी कधी बोललेलो नाही, आताही बोलणारनाही आणि भविष्यातही बोलणार नाही. माझी राजकीय भूमिका काहीही असेल. म्हणूनच, मला आपल्याला इतकच सांगायचे की, मी माझ्या लोकांबरोबर चर्चा करुन, माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून निर्णय घेईल, असेही ओमराजेंनी स्पष्ट केलं. शिंदेंच्या शिवसेनेतील चर्चेवर ओमराजेंनी भूमिका मांडली.

फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा

ईशान्य मुंबईच्या खासदारांनी शिंदेसेनेची वाट धरल्यानंतर त्याच मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. ईशान्य मुंबईत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बैठकीचे सत्र आखले होते. या बैठकीला ईशान्य मुंबईमधील आमदार सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोपरगावकर, विभागप्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मतदार संघात नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला. ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे सेनेच्या वाटेवर असलेल्या खासदारांच्या जिल्ह्यात उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. उद्या पाहिला दौरा हा ईशान्य मुंबईत करणार असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे. उद्या भांडुपमध्ये संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांचा दौरा असणार आहे.

हेही वाचा

Video: मग पवनराजेंना मारलं कुणी? कोर्टाच्या निकालानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, न्यायव्यवस्थेचं हे दुर्दैव

Comments are closed.