अकरावीचे 50 टक्के विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित; 14.37 लाखांपैकी फक्त 7.35 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश, विद्यार्थ्यांचे आता विशेष फेरीकडे लक्ष
अकरावीत प्रवेश मिळवण्यासाठी या वर्षी एकूण 14 लाख 37 हजार 656 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱया पूर्ण होऊनही केवळ 7 लाख 35 हजार 646 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामुळे राज्यातील 50 टक्के विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतला नाही. त्यांचे लक्ष आता खुली फेरी आणि विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष फेरीकडे लागले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येत असलेल्या अकरावी प्रवेशासाठी 14 लाख 37 हजार 656 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आतापर्यंत शून्य फेरीसह तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तिसऱया नियमित फेरीनंतर 7 लाख 35 हजार 646 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, मात्र अद्यापही 7 लाख 2 हजार 010 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. तिसऱया फेरीसाठी 5 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज निश्चित केले होते. त्यापैकी 1 लाख 81 हजार 931 विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जागांचे वाटप झाले. या विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 49 हजार 856 विद्यार्थ्यांनी तिसऱया फेरीत आपले प्रवेश निश्चित केले.
विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर
अकरावीला अद्यापपर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नवीन नोंदणी, अर्जाच्या भाग 1 मध्ये दुरुस्ती, भाग 2 निश्चित करणे, पसंतीक्रम भरणे यासाठी 29 जून रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 1 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 3 जुलै रोजी दुपारी 3 वाजता पहिली विशेष फेरी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 3 ते 6 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
Comments are closed.