बोईसरच्या पास्थळमध्ये जलजीवन मिशनचे काम बोंबलले, 10.75 लाख लिटरच्या टाकीचे काम दोन महिन्यांपासून बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी जलजीवन मिशन योजना पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत मात्र बोंबलली आहे. आंबट गोड मैदानासमोर उभारण्यात येणाऱ्या 10 लाख 75 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडले आहे. आतापर्यंत केवळ पायाचे काँक्रिटीकरण आणि कॉलमसाठी लोखंडी सळ्या उभारण्याचे काम झाले असून पुढील बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पास्थळसह आठ पाड्यांमधील दहा हजार गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पास्थळ परिसरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने जलजीवन मिशनअंतर्गत या पाण्याच्या टाकीचे काम हाती घेण्यात आले होते. पास्थळची एकूण लोकसंख्या 20 हजार उतकी आहे. मात्र या पाण्याच्या टाकीमुळे पास्थळसह आत्मशक्तीनगर, काशीबाई वाडी, के.पी. नगर, महाविर नगर अशा आठ पाड्यांमधील दहा हजार गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. पावसाळ्यात टाकीच्या पायाचे काँक्रिटीकरण करून कॉलमसाठी लोखंडी सळया उभारण्यात आल्या. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून टाकीच्या बांधकामाचे काम बंद पडले आहे. ठेकेदाराचे बाहेरून आलेले मजूर काम सोडून निघून गेले आहेत.

सभोवती झुडपे वाढली

गेल्या दोन महिन्यांपासून काम बंद असल्याने बांधकामाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या लोखंडी सळयांना गंज चढू लागला आहे. अर्धवट बांधकामाभोवती गवत आणि झुडपे वाढली आहेत. प्रत्यक्षात टाकीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेचा आणि पुढील बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाण्याच्या टाकीचे काम सुरू करण्यात आले होते पाण्याच्या टाकीचे काम करण्यात आले पाडल्याने ठेकेदाराचे बाहेरून आलेले मजूर काम नसल्यामुळे निघून गेले आहेत. ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरू आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता महेश पाटील यांनी सांगितले.

Comments are closed.