पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही, मंत्री पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली खदखद; नेमकं काय म्हणाल्

पंकाजा मुंडे: खात्यातील निधीवरून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी खदखद व्यक्त केली आहे. पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही. दंडाच्या रकमेतून निधी जमा होतो, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच सीएसआर फंडातून जसा निधी उभा केला जातो, तसा पर्यावरण खात्यासाठी निधी उभा करा,असेही त्यांनी म्हटले आहे. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन संघटनेच्या (निमा) वतीने आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, सर्वांनी मिळून कचऱ्याबाबत सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा कचरा हा आता केवळ स्थानिक नाही तर जागतिक स्तरावरील गंभीर प्रश्न बनला आहे. पर्यावरण विभागाची जबाबदारी केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळापुरती मर्यादित नाही, तर उद्योगांचे हित जपत पर्यावरणाचेही रक्षण करणे गरजेचे आहे.

आपण जितके पाणी वापरतो, त्यापैकी फक्त 48 टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर उर्वरित 52 टक्के पाणी वाया जाते. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर ‘नमामि गंगे’ सारखे उपक्रम राबवले गेले. दुसरीकडे, उद्योजकांना उद्योग सुरू करताना सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा असते. या सुविधा उपलब्ध करून देणे ही उद्योग विभाग आणि पर्यावरण विभाग यांची संयुक्त जबाबदारी आहे. मात्र, प्राथमिक जबाबदारी उद्योग विभागाने पार पाडावी लागते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

आमच्याकडे स्वतंत्र निधी उपलब्ध नाही

उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणानंतर पर्यावरण विभागाची कारवाई सुरू होते. प्रदूषण नियंत्रणासाठी जे प्रकल्प उभारावे लागतात, त्यासाठी आमच्याकडे स्वतंत्र निधी उपलब्ध नाही, अशी खदखद पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलून दाखवली. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निधी मागण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असे देखील त्यांनी सांगितले. तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर छापे टाकून ते योग्य पद्धतीने कार्यान्वित होत आहेत की नाही, याची तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणार

दरम्यान, नाशिक शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन देखील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे. काही नद्या राज्यात, देशात प्रदूषित आहेत. काही मृत झाल्या आहेत. यासाठी काम करणार आहे. केवळ घाट बांधून सुशोभीकरण करून उपयोग नाही. सांडपाणी प्रक्रिया करून पाणी सोडले जावे,
यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच, राज्यातील 36 एसटीपीमधून प्रक्रिया न करता पाणी सोडले जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत उघडकीस आले आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=C5VYWMT2VZI

आणखी वाचा

Dadar Kabutar khana: दादरचा कबुतरखाना BMC ने ताडपत्री टाकून बंद केला, धान्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

आणखी वाचा

Comments are closed.