परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
परभणी : जिल्ह्याच्या परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथील शेतशिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अनोळखी महिला व पुरुषाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून हा प्रकार आत्महत्या की घातपात, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, गावातील कुणाचेही मृतदेह नसल्याने ह्या दोन्ही व्यक्ती नेमक्या कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले आहेत.
महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून हे प्रेमीयुगुल आहेत की, आणखी काही अशीही शंका उपस्थित होत आहे. पिंपळगाव ठोंबरे येथील संबंधित शेतशिवारात काही दिवसांपासून दुर्गंधी पसरत असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यानंतर शोध घेतला असता झाडाला लटकलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने ग्रामस्थ हादरून गेले. प्राथमिक अंदाजानुसार, ही घटना सुमारे सात ते आठ दिवसांपूर्वी घडली असावी. दोघांनी ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र, नेमकी घटना आत्महत्येची आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी आणि कर्मचारी बळीराम मुंडे यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेहांची अवस्था पाहता ते काही दिवसांपासून झाडावर लटकलेले असल्याचे दिसून आले.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आणि उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, परभणी येथे पाठवले आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, मृतांची ओळख पटविण्याचे कामही सुरू आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.