जिकडे जमीनीचा व्यवहार झाला, तिकडेच पोलिसांचा छापा; पार्थ पवारांच्या कंपनीचे सर्व दस्त ताब्यात,


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ (Parth Pawar) पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १,८०० कोटींचे बाजारभाव असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यात सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे, अशातच विरोधकांनी या प्रकरणी अजित पवारांसह महायुती सरकारवरती हल्लाबोल केला आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समितीची स्थापना केली असून तपास सुरू आहे, तर बावधन पोलीसांनी दुय्यम निबंधक कार्यालयात छापा टाकला आहे, पार्थ पवारांशी संबंधीत कंपनीच्या जमीन व्यवहाराचे सर्व दस्त ताब्यात घेतले असून यातून धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Parth Pawar Land Scam :मुंढव्याच्या वादग्रस्त जमिनीचा इतिहास

मुंढव्यातील ही जमिन ब्रिटीश राजवटीच्या आधी महार समाजातील लोकांना वतन म्हणून देण्यात आली होती‌.  ब्रिटीशांनी इथली जैवविविधता आणि दाट झाडी पाहून इथे उद्यान करण्याचा निर्णय घेतला‌. या ठिकाणी ४०० प्रकारच्या विविध वनस्पती आहेत ज्यातील ५० वनस्पपती दुर्मीळ आहेत‌. ब्रिटीशांनी या जागी उद्यान निर्माण केले. स्वातंत्र्यानंतर ही जागा सरकारने ज्यांना महार वतन म्हणून दिलेली होती त्यांच्याकडून अधिग्रहित केली आणि या जागेवर मालक म्हणून मुंबई सरकार असे नाव लागले. त्या बदल्यात सरकारने त्यावेळी जागा मालकांच्या वारसांना ४५ रुपये मेहताना दिल्याची नोंद आहे. त्यानंतर ही जागा राज्य सरकारच्या महसुल विभागाच्या ताब्यात होती‌. १९७३ साली राज्य सरकारने ही जागा १५ वर्षांच्या भाडेकरारावर केंद्र सरकारच्या बॉटेनीकल सर्वे ऑफ इंडीया या संस्थेला भाड्याने दिली. १९८८ साली हा करार आणखी ५० वर्षांसाठी म्हणजे २०३८ पर्यंत वाढवण्यात आला. मात्र शितल मतेजवानी या महिलेने २००६ साली वतनदारांच्या वंशजांकडून ही या जागेची पॉवर ऑफ एटर्नी करुन घेतली. त्यानंतर या महिलेशी ही जागा पार्थ पवार यांच्या अमेडीया कंपनीला विकली. ही जागा सरकारची असल्याने या व्यवहारात महार समाजाची जमीन लुबाडली आहे असं म्हणता येणार नाही. मात्र ही जागा सरकारी असताना ती महार वजनाची असल्याची दाखवून ती हडप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय आहे.

Parth Pawar Land Scam : जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल – राजेंद्र मुठे

मुंढवा जमिनीवर प्रकरणात मुद्रांक शुल्क चुकवण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क विभागाने एक समिती माझ्या अध्यक्षेखाली बनवली आहे. सात दिवसात या समितीचा अवहाल देण्यात येणार आहे. खोटे कागदपत्र तयार करून ज्यांनी फसवणूक केली आहे त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले जात आहेत. गुन्हा नोंद करण्यासाठी पत्र दिले आहे. तत्कालीन सब रजिस्टर रवींद्र तारु आहेत, त्यांना निलंबित केलं आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल. 2023 च्या उद्योग विभागाच्या धोरणानुसार याच्यामध्ये डेटा सेंटरसाठी आयटीसाठी मुद्रांक शुल्कमध्ये सूट दिलेली आहे. कंपनीने लेटर दिलं होतं, आता याबाबत इंडस्ट्री डिपारमेंटकडून स्पष्टीकरण घेण्यात येईल, त्यानुसार 5% ड्युटी आहे ती त्यांना माफ होऊ शकते का याचा तपास केला जाईल, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (जॉइंट आयजीआर) राजेंद्र मुठे यांनी दिली आहे.

Parth Pawar Land Scam : व्यवहारात अनियमितता झालेली आहे – राजेंद्र मुठे

मेट्रोसिस आणि एलबीटी सेस हा वसूल केला नाही, याबाबत नोटीस देण्यात आली आहे. 6 कोटी भरले नाहीत. व्यवहार करताना जो मुद्रांक चुकवला आहे त्याबाबत चौकशी करण्यातील येईल. या व्यवहारात अनियमितता झालेली आहे. मुळशी हवेली हा टेक्निकल विषय आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आला आहे. या कंपनीकडून काही खोटे कागदपत्र देण्यात आले आहेत त्यामुळे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती देखील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (जॉइंट आयजीआर) राजेंद्र मुठे यांनी दिली आहे.

Parth Pawar Land Scam : बोटेनीकल गार्डनची जमीन अमेडा कंपनीला देण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप

मुंढवा जमीन प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार सुर्यकांत येवले, दिग्वीजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या विरोधात पहाटे पुण्यातील खडकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल‌ झाला आहे. बोटेनीकल गार्डनची जमीन अमेडा कंपनीला देण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रांत अधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.