अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
पार्थ पवार व्हीएसआर विमानात प्रवास: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याची पावती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) स्नेहभोजन कार्यक्रमासाठी पार्थ पवार व्हीएसआर विमानाने (VSR Plane) पोहोचले. दरम्यान, या कंपनीच्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू (Ajit Pawar Death) झाला होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांकडून (Rohit Pawar) यापूर्वीच व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले असून, जय पवारांनीही या कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. व्हीएसआरच्या लियरजेट 45 मॉडेलच्या चार विमानांवर डीजीसीएकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र यानंतरही पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याने विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याचदरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आता पार्थ पवार यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. (Parth Pawar Travel In VSR Plane)
मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारीवर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असं पार्थ पवार म्हणाले. तसेच VSR Aviation बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, असं स्पष्टीकरण पार्थ पवारांनी दिलं. (Parth Pawar Travel In VSR Plane)
मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत…
— पार्थ सुनेत्रा अजित पवार (@parthajitpawar) 28 एप्रिल 2026
शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बागेत पवार कुटुंबीयांचं गेट-टुगेदर- (Parth Pawar Travel In VSR Plane)
शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी पवार कुटुंबीयांचं गेट टुगेदर पार पडलं. शरद पवारांची नात रेवती सुळेंचं लग्न ठरल्याच्या निमित्ताने हा भोजन समारंभ आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह युगेंद्र पवार, रोहित पवार या राजकारणात असलेल्यांसह सर्वच सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र सुनेत्रा पवार पूर्वनियोजित बैठकांमुळे कार्यक्रमाला हजर राहू शकल्या नाहीत. तर जय पवारही पुण्याच्या बाहेर असल्याने उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रेवती सुळेंच्या विवाह सोहळ्या संदर्भात आयोजन तसंच स्वागत समारंभाच्या बाबतीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, पुणे आणि बारामती या ठिकाणी स्वागत समारंभ पार पडणार आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.