माझी मुलं लहान होती, गावोगावी मंगळसूत्र हाती घेऊन फिरायचे; अर्चना पाटलांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी अखेर 20 वर्षानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (Court) आज निकाल दिला असून आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर आज अंतिम निकाल लागला. या निर्णयाने खासदार ओमराजे निंबाळकरांना (Omraje Nimbalkar) मोठा धक्का बसला आहे. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातून प्रतिक्रिया आली असून त्यांच्या सूनबाई अर्चना पाटील (Archana Patil) यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबासाठी आजचा हा निकाल मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. कारण, निकालापूर्वीच माध्यमांशी प्रतिक्रिया देताना ओमराजेंनी, आम्हाला न्याय मिळेल, आम्ही 20 वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत असून न्यायालयीन प्रक्रियेत मोठा संघर्ष केलाय, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, आजचा निकाल खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात गेल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर, पद्मसिंह पाटील यांच्या सूनबाई अर्चना पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सत्याचा विजय झाला, माझी मुलं लहान-लहान होती, म्हणजे सासूबाईंसह आम्हाला त्रास सहन करावा लागला. उगीच बेंबीच्या देटापासून ओरडलं म्हणजे एखादी गोष्ट खरी होत नसते, असेही पाटील यांनी म्हटले.

जो आरोप आमच्यावर केला, ज्याने आमचं सगळंच कुटुंब उध्वस्त झालं, आमच्या मनावर परिणाम झाला. राजकीय नुकसान झालंच, पण मानसिक त्रास खूप झाला, राजकीयदृष्ट्या आम्ही दोघा नवरा-बायकोने खूप त्रास सहन केला. आमची गेलेली वर्षे भरुन निघणार नाहीत, पण आज निश्चितच समाधान आहे, रडू येतंय, ज्या भावना आहेत त्या सांगता येत नाहीत.

मंगळसूत्र घेऊन गावोगावी जायचे

आम्हाला मानसिक त्रास खूप झाला, नववीतील मुलांना तुरुंगात भेटायला जावं लागायचं, राणादादा आणि मी सुद्धा लोकांची कामे करायला आणखी त्वेषाने मतदारसंघात फिरलो. जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा ग्रामपंचायत, विरोधक नेहमीच तोच मुद्दा काढून बोलायचे. तोच तोच मुद्दा, अगदी पहिल्या निवडणुकीपासून मी तर हातात मंगळसूत्र घेऊन गावोगावी फिरत होते, लोकांना सांगत होते की आम्ही कोणाचा खून केला नाही, असे म्हणताना अर्चना पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

न्यायमूर्ती एस. आर. नावंदरांच्या कोर्टात सुनावणी

दरम्यान, सीबीआय विशेष न्यायालयाचे (CBI Special Court) न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्र. 55 मध्ये ही ऐतिहासिक सुनावणी पार पडली. बिहारच्या तुरुंगात असलेला मुख्य शूटर पिंटू सिंग याला पोलिसांनी उशिरा हजर केल्यामुळे काही काळ सस्पेन्स वाढला होता. तो न्यायालयात हजर होण्याआधीच कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयाने निकालवाचनाला सुरुवात केली.

हेही वाचा

ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का, पवनराजे खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, पद्मसिंह पाटीलही सुटले

Comments are closed.