मोदींचं अंतिम पर्व सुरु झालंय, पण जाताना ते हिंदू-मुस्लीम विष पेरुन देशाचे तुकडे करतील: संजय रा
मुंबई: राज्यात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंदुत्ववादी संघटना सध्या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. यावरुन राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. मोदी-शहांचे राज्य एक दिवस जाणारच आहे, पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील. गेल्या दहा वर्षांत भारतात हिंदू (Hindu) आणि मुसलमान (Muslim) अशी दोन राष्ट्र निर्माण झाली आहेत. हे वातावरण फाळणीसदृश आहे. शिवरायांचा इतिहास बदलणे, हिंदू-मुसलमानांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी हा ठरवून सुरू असलेला मूर्खपणा भारताला हिंदू पाकिस्तानच्या दिशेने ढकलत आहे, असे मत संजय राऊत यांनी ‘रोकठोक’मध्ये व्यक्त केले आहे.
मोदी काळाचे आता अंतिम पर्व सुरू झाले आहे. मोदी व त्यांचे लोक केव्हा तरी जातील, पण जाताना या देशाचे तुकडे करून जातील हे स्पष्ट दिसते. देशात आज जो जातीय आणि धार्मिक विद्वेष वाढला आहे तो ‘फाळणी’आधी याच पद्धतीने दिसत होता. आज येथले काही हिंदू (अर्थात बाटलेले) मराठी बा. जिनांच्या भूमिकेत शिरले आहेत. देशासाठी ते धोकादायक आहे. मुसलमानांच्या कुरापती काढून त्यांना भडकविण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जात आहे, तो धक्कादायक आहे. दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्राफी अंतिम सामन्यात भारत विजयी झाला. त्यानंतर ठिकठिकाणी भाजपच्या समर्थकांनी विजयी मिरवणुका काढल्या. या मिरवणुका रात्रीच्या वेळी मुद्दाम मशिदीसमोर आणून तेथे गोंधळ घालणे, जोरजोरात वाद्ये वाजविणे, मुसलमानांच्या विरोधात घोषणा देणे असले प्रकार सुरू झाले. मध्य प्रदेशातील महू येथे यामुळे दोन गटांत दंगल उसळली. त्याचे पडसाद इतरत्र उमटले. विजय उत्सव साजरा करण्याची ही पद्धत नाही, पण हे प्रकार सातत्याने घडवून देशात दंगलीचा भडका उडविण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
भारत ‘हिंदू पाकिस्तान’ होण्याच्या दिशेने चाललाय का? संजय राऊतांचा सवाल
भारतात सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. भारतीय मुसलमान आणि भारतीय हिंदू ही दोन वेगळी राष्ट्र आहेत. त्यांचे आपले स्वतंत्र धर्म, परंपरा, रीतिरिवाज आहेत. त्यामुळे सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून मुसलमानांना हिंदूबहुल भारताबाहेर आपली वेगळी मातृभूमी निर्माण करण्याचा अधिकार असायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते.डॉ. आंबेडकर यांनीही एकदा सांगितले होते की, “येथे हिंदू आणि मुसलमान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र नांदताना दिसत आहेत.” मात्र, पंडित नेहरू या शहाण्या माणसाने ठोकून जाहीर केले, “देशाची घटना धर्मनिरपेक्षच राहील. मी भारताचे हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही.” धर्माच्या आधारावर निर्माण झालेली अनेक राष्ट्र कोसळून पडली. त्यात पाकिस्तान आहेच. पंडित नेहरूंसारख्या लोकांनी या देशाचे हिंदू पाकिस्तान होऊ दिले नाही म्हणून हा देश टिकला, पण मोदी काळात देश पुन्हा नव्या फाळणीच्या दिशेने ढकलला जात आहे. हिंदू पाकिस्तानच्या दिशेने आपण निघालो आहोत काय?, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.
मुसलमानांबरोबर आम्ही नांदणार नाही, असे विष भारतीय जनता पक्ष व त्यांच्या विचारधारेचे लोक उघडपणे पसरवत आहेत. तसा त्यांचा उघड प्रचार चालला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडे जाहीरपणे सांगितले की, “हिंदू आणि मुसलमानांचा ‘डीएनए’ एकच आहे. हिंदू व मुसलमानांनी एकत्र राहायला हवे.” ते पहिल्यापासूनच एकत्र आहेत, पण संघ विचाराशी नव्याने जोडलेल्या लोकांना हा विचार मान्य नाही. महाराष्ट्राचे एक मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रात हिंदूंसाठी व मुसलमानांसाठी स्वतंत्र मटणाची दुकाने निर्माण करण्याचे जाहीर केले, हे श्री. भागवत यांना मान्य आहे काय? या सगळ्यांनी लोकांच्या मनात मुसलमान समाजाविषयी तिरस्कार आणि घृणा निर्माण केल्याने देशाचा सामाजिक व राष्ट्रीय प्रवाह विषारी होत आहे.
पंतप्रधान मोदी हे निवडणूक प्रचारात सांगतात, “मुसलमान हिंदू महिलांची मंगळसूत्रे खेचून नेतील. म्हणून भाजपला मतदान करा.” पण तेच पंतप्रधान मुस्लिम राष्ट्रांचे प्रमुख भारतात येतात तेव्हा त्यांना घ्यायला व मिठ्या मारायला विमानतळावर जातात. अमेरिका दौऱ्यात प्रे. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी व भारताचा उघड अपमान केला. प्रे. ट्रम्प हे मुसलमान नाहीत. मोदी तो अपमान गिळून मायदेशी परतले व तो अपमान लोकांनी विसरावा म्हणून देशात ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ सुरू केले आणि आता महाकुंभातले गंगाजल घेऊन मॉरिशसला रवाना झाले. यामुळे देशाचा कोणता विकास होणार? उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुसलमान माफिया आणि गुंडांचे एन्काऊंटर सुरू आहे, पण योगी ज्या जातीचे आहेत त्या जातीच्या गुंड आणि माफियांना पूर्ण अभय आहे. म्हणजे हिंदू माफियांनी हिंदूंना लुटण्याचा पूर्ण अधिकार भाजपशासित राज्यात आहे, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
नवे मटण हृदयसम्राट
महाराष्ट्रात हिंदूंसाठी मटणाची वेगळी दुकाने, पण मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूंना त्यांच्या गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत व जागा नाकारल्या जात आहेत. त्यावर हे ‘मटण’वाले ‘बाल हिंदुहृदयसम्राट’ बोलणार आहेत काय? भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुसलमान उतरले होते. अनेक मुसलमान क्रांतिकारक फासावर गेले. अनेक मुसलमान स्वातंत्र्ययोद्धे ‘अंदमान’च्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. अनेकांना तेथेच मरण आले. त्यांचाही इंग्रजांनी छळ केला. मग मुसलमानांच्याही रक्तातून मिळवलेल्या ‘स्वातंत्र्या’तून आजचे ‘नव हिंदू मटण हृदयसम्राट’ बाहेर पडणार आहेत काय? मुसलमानांच्या योगदानातून मिळवलेल्या भारतात आम्ही श्वासही घेणार नाही, असे सांगत ते कोणत्या राष्ट्रात जाणार? भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात व भारतनिर्मितीत शून्य योगदान असलेले लोक न्यूनगंडाने पछाडले आहेत आणि हिंदू-मुसलमान अशी दोन राष्ट्र पुन्हा निर्माण करीत आहेत. हा डाव उधळून लावायला हवा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
शिवरायांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानासाठी आपल्या मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी ठेवली. पुढे शिवरायांनी हिंदवी स्वराज्यातही सर्वच धर्मांचा सन्मान केला. त्यांच्या सैन्यातील एक तृतीयांश सैनिक मुस्लिम होते. शिवरायांच्या ‘नौदल’ सेनेचे नेतृत्व सिद्दी संबलच्या हाती होते. महाराज आग्यात औरंगजेबाच्या नजरकैदेत होते तेव्हा तेथून सुटकेसाठी शिवरायांना मदत करणारा मदारी मेहतर हा मुस्लिम होता. छत्रपतींच्या गुप्तहेर विभागाचा सचिव हैदर अली होता आणि त्यांच्या शस्त्रागाराचा प्रमुख इब्राहिम खान होता. शिवाजी महाराजांनी ‘धर्मांध’ राजकारण केले नाही. त्यांनी सर्व भाषांचा आदर केला. आज शिवरायांना वेगळ्या धर्मांध चौकटीत उभे करणे हे राष्ट्रीय पाप आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना महाराष्ट्रातून शिवरायांचा इतिहास नष्ट करायचा नसेल तर ते अशा उठवळ चवचाल लोकांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवतील. औरंगजेबाची कबर काही लोकांना उखडायची आहे, पण महाराष्ट्रात हिंदू पाकिस्तानवाले हिंदू औरंगजेब निर्माण करीत आहेत. ते कबरीतल्या औरंगजेबापेक्षा भयंकर आहेत, असे ‘सामना’तील लेखात म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=lgmstidcozc
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.