पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत भाज आणि शिवेसना यांच्यातील जागा वाटपाची चर्चा सुरुच राहिलेली. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार असं नेत्यांनी सांगितलं तरी प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसायला मिळत आहे. पुण्यात भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित असं चित्र आहे. म्हणजेच पुण्यात थेट दोन आघाड्यांमध्ये निवडणूक होणार नसून बहुरंगी लढती होणार आहेत.
पुण्यातील चित्र बहुरंगी लढतींचं
पुणे महापालिकेच्या 165 जागांच्या निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आमदार रोहित पवार यांनी देखील पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं सांगितलं होतं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहे. मात्र, पुण्यात अजि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. शरद पवारा़ंचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुण्यात नक्की किती जागा लढवणार हे अंकुश काकडेंनी अनेकवेळा विचारुन देखील सांगितलेलं नाही. 70 पेक्षा अधिक ए बी फॉर्म वाटल्याचे काकडे म्हणालेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत.
पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीला देखील फारसा अर्थ उरलेला नाही. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील युती जशी फक्त कागदावरच राहिली तशी बहुचर्चित दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी देखील फक्त कागदावरच राहिल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजप आणि शिवसेनेचं काय?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील आज उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी एबी फॉर्म वाटपाबाबत स्थानिक नेते माहिती देतील असं, म्हटलं. मात्र, त्यांच्याकडून निश्चित आकडा सांगण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असेल, असं उदय सामंत म्हणाले. कार्यकर्त्यांशी चर्चा करु, संवाद करु असं सामंत यांनी सांगितलं. भाजपकडे 25 जागा मागितल्या होत्या, ते 15 जागा देत असल्याचं सेनेकडून सांगण्यात येत आहे.
पुणे महापालिकेत गेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली होती. या निवडणुकीत आता सर्वच पक्ष रिंगणात उतरले असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल. मविआत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे.
आणखी वाचा
Comments are closed.