वैष्णव जन तो तेणे कहिये…! पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती काकडे यांची निराधार मनोरुग्णांसाठी माणुसकीची सेवा; शेकडो जणांना दिला मायेचा आधार

>> राजेश देशमाने

स्वतःची नोकरी, संसार आणि कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळत समाजातील निराधार, बेघर, दिव्यांग आणि मनोरुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र प्रयत्न करणार्‍या ज्योती अशोक काकडे यांनी माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे. बुलढाणा पोलीस दलात पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती काकडे या दिव्या फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्य सेवा पुनर्वसन प्रकल्प चालवितात. पती अशोक काकडे यांच्या साथीने त्यांनी समाजाने दुर्लक्षित केलेल्या व्यक्तींना निवारा, अन्न, उपचार आणि आपुलकी मिळवून देण्याचे कार्य हाती घेतले आहे. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीर पराई जाणे रे’ या संतविचाराचा प्रत्यय त्यांच्या सेवाकार्यातून येतो.

देशसेवेचे संस्कार, समाजसेवेचा ध्यास
सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या ज्योती काकडे यांना त्यांचे वडील माजी सैनिक असल्यामुळे देशसेवेचे संस्कार मिळाले. त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. सन २००६ मध्ये त्यांची पोलीस दलात भरती झाली. पोलीस सेवेत कर्तव्य बजावत असताना समाजातील वंचित घटकांसाठीही काहीतरी करण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. सन २०१० मध्ये अशोक काकडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर या सेवाभावी विचाराला पतीचीही साथ मिळाली. रस्त्यावर भटकणार्‍या, मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या आणि निराधार झालेल्या व्यक्तींची अवस्था पाहून या दाम्पत्याने त्यांच्यासाठी हक्काचे घर उभारण्याचा संकल्प केला. सन २०१५ मध्ये दिव्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला संस्थात्मक स्वरूप दिले. सुरुवातीला रस्त्यावर आढळणार्‍या मनोरुग्णांना अन्न देणे, त्यांची वैयक्तिक स्वच्छता राखणे, कपडे उपलब्ध करून देणे, वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न करणे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेणे, अशी कामे सुरू केली. मात्र गरजूंची संख्या वाढत गेल्याने कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देण्याची गरज भासू लागली. त्यानंतर बुलढाणा-खामगाव मार्गावरील वरवंड फाट्यानजीक दिव्य सेवा पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पासाठी ज्योती काकडे यांनी बँकेकडून कर्ज घेऊन जमीन खरेदी केली. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने आणि स्वतःच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प उभा राहिला. शासनाकडून नियमित अनुदान उपलब्ध नसतानाही काकडे दाम्पत्याने सेवाकार्य सुरू ठेवले आहे.

२८६ महिला-पुरुषांची देखभाल व ६०० हून अधिक व्यक्तींचे पुनर्वसन
दिव्य सेवा प्रकल्पात उपलब्ध माहितीनुसार सध्या सुमारे २८६ निराधार महिला आणि पुरुषांचा सांभाळ केला जात आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या, कुटुंबापासून दूर गेलेल्या, दिव्यांग आणि विविध कारणांमुळे बेघर झालेल्या व्यक्तींना येथे आश्रय दिला जातो. बिहार, झारखंड, पंजाब आणि दिल्ली यांसारख्या विविध भागांतील व्यक्तींचाही या प्रकल्पात सांभाळ करण्यात आला आहे. या व्यक्तींना निवारा देण्याबरोबरच वेळेवर अन्न-पाणी, कपडे, स्वच्छता आणि आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाते. अनेक मनोरुग्णांना स्वतःची स्वच्छता राखणेही शक्य होत नाही. अशा वेळी ज्योती काकडे स्वतः पुढाकार घेऊन त्यांची अंघोळ घालणे, कपडे बदलून देणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे यांसारखी कामे करतात. काही महिलांना शिवणकाम आणि विणकाम शिकवून त्यांना स्वावलंबी बनविण्याचाही प्रयत्न केला जातो. दिव्य सेवा प्रकल्पाचे महत्त्वपूर्ण यश म्हणजे निराधार व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्याचे कार्य. मानसिक आजारामुळे किंवा अन्य कारणांमुळे घरापासून दूर गेलेल्या अनेक व्यक्तींना स्वतःचे नाव, गाव अथवा पत्ता सांगता येत नाही. अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेणे आणि त्यांना घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे, हे अत्यंत संयमाचे काम आहे. दिव्या फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत ६०० हून अधिक मनोरुग्ण महिला-पुरुषांचे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती आहे. उपचार, देखभाल आणि समुपदेशनाच्या मदतीने अनेकांना पुन्हा कुटुंबात परतण्याची संधी मिळाली. निराधारांना केवळ आश्रय देण्याऐवजी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जात आहे.

नोकरी सांभाळून सेवाकार्य व पुरस्कारांनी कार्याचा गौरव
ज्योती काकडे या बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. पोलीस दलातील कामकाज पूर्ण केल्यानंतर त्या प्रकल्पात जाऊन लाभार्थ्यांची विचारपूस करतात. त्यांच्या गरजांनुसार मदतीचे नियोजन करतात. अनेकदा स्वतः स्वयंपाक करून त्यांना जेवण देतात. नोकरी, घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळताना या सेवाकार्यासाठी वेळ देणे आव्हानात्मक असले, तरी त्यांनी सेवाभाव कायम ठेवला आहे. पती अशोक काकडे यांची त्यांना भक्कम साथ लाभते. दोघेही मिळून प्रकल्पाचे व्यवस्थापन, आवश्यक वस्तूंची व्यवस्था आणि दानशूर व्यक्तींशी संपर्क साधण्याचे काम करतात. सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांचे सहकार्य लाभत असून, माहेर संस्थेच्या दीदी लुसी कुरियन आणि समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनीही प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या होत्या. ज्योती काकडे य्ाांच्या सेवाकार्याची दखल घेत त्यांना ‘सकाळ आयडॉल्स महाराष्ट्र २०२२’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच दिव्या फाउंडेशन, बुलढाणा या संस्थेला दिव्यांग, निराधार, बेघर आणि मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या कार्याबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा सामाजिक कार्य पुरस्कार २०२६ जाहीर झाल्याची माहिती आहे. जिल्हा युवा पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती समाजभूषण गौरव पुरस्कार यासह दिव्य सेवा प्रकल्पाच्या कार्याचाही समाजभूषण आणि उत्कृष्ट समाजकार्य पुरस्काराने गौरव झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. निराधार मनोरुग्ण महिलांना सुरक्षित निवारा, वैयक्तिक स्वच्छता, वैद्यकीय मदत आणि भावनिक आधार मिळावा, यासाठी महिलांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा ज्योती काकडे यांचा मानस आहे. याशिवाय अनाथ मुलांना दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत मदत करणे आणि विधवा महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, अशा विविध उपक्रमांमध्येही दिव्या फाउंडेशन कार्यरत आहे.

माणुसकी हाच खरा धर्म
समाजाने दुर्लक्षित केलेल्या व्यक्तींना जवळ करणे, त्यांच्या वेदना समजून घेणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे, हेच ज्योती काकडे यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा आणि सेवाकार्यातील ममत्व यांचा समन्वय साधत त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान जपले आहे. पतीच्या साथीने उभारलेला दिव्य सेवा प्रकल्प आज अनेक निराधारांसाठी आधारवड ठरत आहे. स्वतःच्या सुखापुरते जीवन न जगता दुसर्‍यांच्या दुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती समाजासाठी प्रेरणादायी आहे. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीर पराई जाणे रे’ या ओळींचा अर्थ कृतीतून साकार करणार्‍या ज्योती काकडे यांनी माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे आपल्या सेवाकार्यातून दाखवून दिले आहे.

Comments are closed.