युवराज सिंगची आयपीएलमध्ये एन्ट्री! पुढच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठी भूमिका बजावणार
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 19 वा हंगाम संपून जास्त काळ लोटलेला नाही, तोच आता फ्रेंचायजींनी पुढच्या हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2027 च्या हंगामामध्ये युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. युवराजसोबतच, भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly), जे याआधीही दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते, त्यांचीही संघात पुनरागमन करणे निश्चित मानले जात आहे.
रिपोर्टनुसार, युवराज सिंग आयपीएलच्या 20 व्या हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर, 44 वर्षीय युवराज सिंग गेल्या काही काळापासून अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन (मेंटर) करत आहे. यामध्ये अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी आयपीएल 2026 मध्ये आपल्या फलंदाजीने जबरदस्त कामगिरी केली होती. युवराज सिंग पहिल्यांदाच अधिकृतपणे आयपीएलच्या कोचिंग सेटअपमध्ये पाऊल ठेवणार आहे.
आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी न जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 19 व्या हंगामाची सुरुवात खूप चांगली केली होती, परंतु त्यानंतर त्यांच्या कामगिरीत सातत्याने घसरण पाहायला मिळाली. लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला 14 पैकी केवळ 7 सामन्यांत विजय मिळवता आला आणि 7 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. या खराब कामगिरीनंतर कर्णधार अक्षर पटेल (Axar Patel & Hemang badani) आणि हेड कोच हेमंग बदानी यांना अनेक निर्णयांवरून टीकेचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत, आता पुढच्या हंगामाआधी दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग सेटअपमध्ये बदल होणे निश्चित आहे, ज्यामध्ये युवराज सिंग आणि सौरव गांगुली यांचा समावेश असेल. याशिवाय, संघाच्या खेळाडूंच्या यादीतही (स्क्वॉड) मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
Comments are closed.