जय पवारांवर प्रफुल पटेल आणि तटकरेंचा दबाव; पत्रकार परिषद घेण्यापासून रोखलं? तटकरेंनी सर्व प्रश्

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव जय पवार (Jay pawar) यांनी  काही दिवसांपूर्वी मी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली. पण ती पत्रकार परिषद पुढे ढकलली त्याचबरोबर अद्यापही ती होऊ शकली नाही, त्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं की, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, भाजपच्या काही नेत्यांनी जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली. त्यांच्या दबावामुळे ही पत्रकार परिषद झाली नाही असं मला वाटतं. माझं जयशी बोलणं झालं नाही, असं रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटलं होतं, त्याबाबत आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भाष्य केलं आहे.

आज बोलताना सुनील तटकरे म्हणाले की,  हा अत्यंत कपोलकल्पित आणि निराधार आरोप आहे. गेल्या 28 तारखेला  अजितदादांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला तेव्हा मी पार्थ आणि जय यांच्यासोबत बारामतीत गेलो, अपघाताच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर मी काटेवाडीत अजित पवारांच्या आईंना जाऊन भेटलो. तिकडे 15 ते 20 मिनिटे बसलो. त्यानंतर पार्थ आणि जय यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घ्यावी. मी तात्काळ सल्ला दिला त्यांनी याबाबत बोलणे आवश्यक आहे. जय पवार यांनी ट्विट करुन पत्रकार परिषदेच्या तारखा दिल्या होत्या. त्या तारखा पार्थ पवार यांच्याशी चर्चा करायची असल्याने बदलण्यात आल्या. त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी, असे मी त्यांना सांगितले आहे. पण ती पत्रकार परिषद कधी घ्यायची, हा निर्णय जय आणि पार्थने घ्यायचा आहे. कोणीतरी यासंदर्भात बोललं पाहिजे, हीच भावना आम्हा सर्वांची आहे. केवळ पूर्वग्रहदुषित पद्धतीने आरोप करण्याचा प्रकार काही लोक करत आहेत. पार्थ आणि जय हे दादांचे चिरंजीव आहेत. पण पक्ष त्यांच्यापाठी ठामपणे उभा आहे.  ते पत्रकार परिषदेबाबत योग्य वेळी निर्णय घेतील. कदाचित त्यांना आणखी जास्त माहिती हवी असेल. पण माझ्याकडून किंवा प्रफुल पटेल यांच्याकडून कधीही जय पवार यांना पत्रकार परिषद घेण्यापासून थांबवण्यात आले नाही, असंही तटकरेंनी म्हटलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर तटकरेंची प्रतिक्रिया

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण भाजपच्या दबावामुळे अडले आहे का, या प्रश्नाचे उत्तरही सुनील तटकरे यांनी दिले. त्यांनी म्हटले की, भाजपकडून कधी विलीनीकरणाबाबत दबाव राहिलेला नाही. ज्यावेळी आम्ही अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या घडामोडी सर्वांनी पाहिल्या आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीत कधीही हस्तक्षेप केलेला नाही. भाजपच्या केंद्र आणि राज्य नेतृत्त्वाने आम्हाला नेहमीच मित्रपक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली आहे. त्यामुळे भाजपचा दबाव असण्याचा प्रश्न नाही. प्रश्नांतर्गत आमचा विलीनीकरणाबाबत आमचं म्हणणं असण्याचं कारण नाही, यासंदर्भातील निर्णय वहिनीच घेतील. या क्षणाला माझ्याकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. पण ज्येष्ठ आमदार सुनील अण्णा कोणत्याही संदर्भात हे वक्तव्य केले आहे, हे मला माहिती नाही. त्यामुळे मला या विषयावर मत व्यक्त करायचं नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हा निर्णय त्यांच्याच संमतीने घेतला. त्यानंतर विलीनीकरणाच्या विषयावर पडदा पडला, त्यावर पुन्हा कधी चर्चा झालीच नाही. मी दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. मी अजितदादांसोबत महाराष्ट्रभर फिरलो आहे. पण विलीनीकरण हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. या सगळ्या जर-तरच्या गोष्टी असल्याने आज मला याबाबत काही बोलायचं नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

Comments are closed.