जयकुमार गोरेंना प्रणिती शिंदेंकडून नोटीस, अब्रूनुकसानीचा दावा; म्हणाल्या, 7 दिवसांत माफी मागा..

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातले असले तरी भाजपने सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा दिली. त्यानंतर, जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात आपला वेगळाच दबदबा निर्माण केला असून निवडणुकांमधील त्यांच्या भाषणांची, वक्तव्यांचीही सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. तर, राजकीय विरोधकही त्यांच्यावर सातत्याने टीका करतात. त्यातच, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि जयकुमार गोरे यांच्यातही शा‍ब्दिक वाद यापूर्वीही चांगलाच रंगला आहे. मात्र, नुकतेच एका रस्तेकामाच्या श्रेयवादावरुन करण्यात आलेल्या टोलेबाजीवरुन आता पालकमंत्री जयकुमार गोरेंना प्रणिती शिंदेंकडून (Praniti shinde) नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, 7 दिवसांत आपल्या वक्तव्यावरुन बिनशर्त माफी मागा, अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आलीय.

खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. खासदार प्रणिती शिंदेनी अब्रूनुकसान केल्याचा आरोप करत गोरेंना ही नोटीस बजावली. 7 मे रोजी सोलापुरात माध्यमाशी संवाद साधताना पालकमंत्री गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदेवर टीका केली होती. प्रणिती शिंदेना उद्देशून बोलताना ‘सोलापूरमधील रस्त्याचा विचार करतं नाहीत, त्या दिल्लीतील राहुल गांधी यांच्या घरासमोरील रस्त्याचा विचार करतात’ अशा पद्धतीचे विधान जयकुमार गोरेनी केले होते. त्यावरुन, खासदार प्रणिती शिंदेच्यावतीने ॲड.असीम सरोदे, ॲड.श्रिया आवले आणि ॲड.आर्या राजेभोसले यांनी पालकमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

मोहोळ-वळसंग रस्त्यावरून भाजप-काँग्रेस नेत्यामध्ये सुरु असलेल्या श्रेयवादाच्या मुद्द्यावरुन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंवर बोचरी टीका केली होती. मात्र, हे विधान द्विअर्थी असून या विधानामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचा दावा करत गोरेंना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदेंबाबत याआधी केलेल्या अन्य काही विधानांचाही उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसात जयकुमार गोरेनी प्रणिती शिंदेची बिनशर्त माफी मागावी, अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे, आता जयकुमार गोरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून मंत्री महोदय माफी मागणार की कायदेशीर मार्गाने उत्तर देणार हे पाहावे लागेल.

प्रणिती शिंदेंवर यापूर्वीही टीका

दरम्यान, यापूर्वी देखील निवडणुकांवेळी जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंवर टीका केली होती. प्रणिती ताईंनी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचे काम केलं. आयुष्यभर कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना शिंदे साहेबांनी सोबत घेतलं, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळं प्रणिती शिंदेनी केलं, अशा शब्दात जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंवर बोचरी टीका केली होती.

हेही वाचा

CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले ‘ती’ गाडी पोलिसांची

आणखी वाचा

Comments are closed.